Friday, 31 July 2015

उपमा आणि साहेब
भगवान शंकर नेहमीप्रमाणे पृथ्वीचा फेरफटका मारायला निघाले आहेत. पार्वती बरोबर आहेच. पृथ्वीचा फेरफटका मारताना हल्ली त्यांना विहिरीत कुऱ्हाड पडली म्हणून डोक्याला हात लावून बसलेला लाकूडतोड्या दिसत नव्हता. याचं कारण कुऱ्हाड बुडण्याएवढं पाणी असणाऱ्या विहीरीच राहिलेल्या नव्हत्या. समजा खरंच एखादा लाकुडतोड्या विहिरीत कुऱ्हाड पडली म्हणून बसलेला दिसला तर अडचण नको म्हणून शंकराने आपल्या बरोबर नॅनो जेसीबी मशीनहि घेऊन ठेवले होते. पृथ्वीचा हवाई फेरफटका मारताना अपेक्षेप्रमाणे त्यांना कुऱ्हाड विहिरीत पडलेला लाकुडतोड्या कुठेच दिसला नाही. मानवाला मदत करण्याचा योग आज आपल्या कुंडलीत नाही असे शंकराला वाटू लागले. तेवढ्यात त्यांचे लक्ष ऊसाच्या शेताशेजारी उभ्या असलेल्या एका माणसाकडे गेले.
शंकराचे विमान हळूहळू खाली येते. ऊसाच्या शेताच्या बाजूला चिंताक्रांत चेहऱ्याने उभ्या असलेल्या माणसाच्या जवळ विमान उभे राहते. शंकर, पार्वती खाली उतरतात. साक्षात शंकराला पाहून त्या माणसाला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही.पण त्याला विश्वास ठेवणे भाग पडते. 
' बोल वत्सा, कसली काळजी पडली आहे तुला ' भगवान शंकर आत्यंतिक प्रेमळ स्वरात विचारतात. 
' देवा अगदी वेळेवर आलास बघ. लाकूडतोड्याला कुऱ्हाड काढून दिल्याची गोष्ट लहानपणापासून ऐकत आलोय मी. मलाही तशीच मदत कर देवा ' चिंताक्रांत चेहऱ्याचा माणूस कळवळीने शंकराला सांगतो. 
' अगदी मोकळेपणे सांग. तुझ्यासारख्या माणसांसाठी तर आम्ही चोवीस तास हेल्पलाईन चालू केली आहे. कुठे पडली आहे तुझी कुऱ्हाड  '  भगवान शंकर अजून लाकूडतोद्याच्या गोष्टीतून बाहेर आलेले नसतात. 
' माझी कुऱ्हाड पडली नाहीये' 
' मग काही हरवलंय का ' 
' काही नाही हरवलंय.'
' मग काय प्रॉब्लेम आहे तुझा ?' 
' माझी जीभ सारखी घसरतीय हो अलीकडे ' त्या माणसाने आप प्रॉब्लेम एकदाचा सांगितला. 
' पाउल घसरत हे ऐकून माहित होतं. पण जीभहि घसरते हे पहिल्यादांच ऐकतोय. हा काय प्रकार आहे वत्सा ' 
' पाऊल घसरण्यासारखा प्रकार नाहीये हो हा ' शंकराला कसे समजावून सांगावे असा प्रश्न त्या माणसापुढे पडतो. मग काही विचार करून तो बोलू लागतो. 
' या प्रकाराला स्लीप ऑफ टंग असे म्हणतात. यात काय होत, त्या माणसाचा आपल्या तोंडावर ताबाच रहात नाही. '
भगवान शंकर त्या माणसाला आपादमस्तक न्याहाळतात. सवयीप्रमाणे पार्वती नवऱ्याच्या मनात काय चालले आहे हे ओळखते. 
' अहो त्यांचा ' खाण्या ' वर ताबा नाही असं त्यांना म्हणायचं नाही. त्यांचा त्यांच्या बोलण्यावर ताबा राहिलेला नाही असं त्यांना सांगायचेय ' पार्वती आपल्या पतिराजांना सांगते. हे ऐकून तो माणूस बरोबर आहे अशा अर्थाने आपली मान हलवतो. 
  शंकराला या स्लीप ऑफ टंग झालेल्या इसमाबद्दल कुतूहल वाटू लागते. ते त्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहू लागतात. काही क्षणातच त्या इसमाची कुंडली शंकराच्या मन:चक्षू समोर उभी राहते. सदरहू इसमाचा अलीकडे आपल्या बोलण्यावर ताबा राहिलेला नाही हे शंकराच्या लक्षात येते. सदर व्यक्ती अलीकडे वारंवार मध्यावधी निवडणुकीचे भजन म्हणू लागली आहे असेही भगवान शंकराला दिसते. साहेब म्हणून परिचित असणाऱ्या या व्यक्तीने आपल्या मुंब्रा स्थित जितेंद्र नामक एका सहकाऱ्याला सुविद्य, सुशीक्षीत अशा उपमा दिल्याने भूतलावर हास्य स्फोट होऊ लागले आहेत. लोक हसून हसून गडाबडा लोळू लागले आहेत.  या हास्यस्फोटाचे जनतेवर भयंकर परिणाम झालेले आहेत. आपली काम धामे सोडून लोक हसतच बसले आहेत. एकूणच भूतलावर साहेबांच्या उपमा नामक गृह उद्योगाने अनर्थ माजला आहे. आपण असे काही आहोत हे जितेंद्र नामक व्यक्तीलाही ठाऊक नव्हते. त्यामुळे त्या व्यक्तीलाही आपल्याबाबत साहेब नामक व्यक्तीने दिलेल्या उपमेमुळे जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. आपल्यात एवढे दुर्गुण आहेत आणि साहेब नामक व्यक्तीने आपल्याला हे आधीच न सांगितल्याबद्दल चि. जितेंद्र याला साहेब नामक इसमाचा भयंकर राग आला आहे. आता साहेब या व्यक्तीला आपण काय बोलून गेलो हे कळले आहे. उपमा देण्याची ही सवय अशीच राहिली तर आपण छगन नामक इसमाला 'दारिद्र्य रेषेखालील माणूस ' अशी उपाधी देऊ अशी भीती साहेबांना वाटू लागली आहे … साहेब नामक इसमाची कुंडली मन:चक्षुपुढे दिसल्यावर शंकराला त्या माणसाच्या प्रॉब्लेम वर काय औषध द्यावे हे लक्षात येत नाही.  
' वत्सा, तू विहिरीत काय समुद्रात सापडलेली कुऱ्हाड काढून देईन. मात्र ही तुझी घसरलेली जीभ शोधणे महाअवघड आहे. ' असं म्हणत भगवान शंकर पार्वतीसह आपल्या विमानातून निघून जातात.
चंद्रहास मिरासदार

Friday, 17 July 2015

तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम

भ्रष्टाचाराला आज आपला खूप खूप अभिमान वाटू लागला होता. याला कारण तसेच घडले होते. स्वच्छ कारभाराचे ब्रँड ऍंबॅसिडर ठाकरे कुलवंशीय श्रीमान उध्दवराव यांनाही भ्रष्टाचाराचे दर्शन घडले होते. 'बघावं तिकडे भ्रष्टाचार दिसतो आहे' असे उध्दवराव म्हणाल्याचे भ्रष्टाचाराने आपल्या सुपाएवढया कानांनी ऐकले होते. उध्दवराव हा एक सरळ, भला माणूस म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द होता. त्याचे पाऊल कधीच वाकडे पडायचे नाही. त्याचे पाऊल वाकडे पडू नये यासाठी पांढऱ्या शुभ्र पैशाचे उत्पादक असलेले अविनाशजी भोसले यांनी 'पांडव' नामक आपले हेलीकॉप्टर उध्दवरावांच्या सेवेस हजर ठेवले होते. याच वाहनातून उध्दवरावांना गड-किल्ल्यांची छायाचित्रे काढता येत असत. असो. अशा उध्दवरावांनी आपले 'नाव घेतले' याचा भ्रष्टाचाराला कोण म्हणून आनंद झालेला होता. याच आनंदात तो उध्दवरावांना भेटण्यास निघालेला होता. मातोश्री नामक उध्दवरावांच्या सदनिकेत तो सक्काळी सक्काळीच दाखल झाला. पाहतो तर तेथे तोबा गर्दी उसळलेली. आपल्याला या गर्दीतून उध्दवरावांना भेटावयास मिळणार का? असे त्याला वाटू लागले. दालनाबाहेर 'जय-विजय' अशा दोघांच्या भूमिका एकटेच सांभाळणारे मिलिंदराव नार्वेकर मुंगीलासुध्दा शिरू देत नव्हते. बडया राजकीय मंडळींकडे किंवा अधिकाऱ्यांकडे जायचे असेल, तर अविनाश भोसले या 'मास्टर की'चे नाव घ्यायचा अवकाश, तुमच्यासाठी सर्व गड-कोटांचे दरवाजे किलकिले नव्हे, तर सताड उघडे होतात, असे भ्रष्टाचाराला एका पत्रकाराने खात्रीपूवक सांगितले होते. अविनाश भोसले ही मास्टर-की असेल, तर संजयनाना काकडे नामक 'बनवून आणलेली किल्ली'सुध्दा या लोकांकडे जाताना उपयोगी ठरते, असेही त्याला पत्रकार मित्राने सांगितले होते. पत्रकार मित्राने रात्रीच्या मैफलीत रात्री अकरानंतर सांगितलेले किती खरे आहे, याची चाचणी घेण्याचे भ्रष्टाचाराने ठरविले. पहिला प्रयोग चि. उध्दवरावांकडे करण्याचे ठरविले. कारण एक वेळ राष्ट्रपती, पंतप्रधानांनासुध्दा भेटणे शक्य आहे; पण चि. उध्दवरावांभोवती नार्वेकर नामक 'चायना...' चुकलो, 'मालवणी वॉल' असल्याने त्यांच्यापर्यंत भल्याभल्यांना पोहोचता येत नाही, असे भ्रष्टाचाराने ऐकले होते, वाचले होते. आताही तशीच परिस्थिती आहे का, याची 'टेस्ट' चि. उध्दवरावांकडे घेण्याचे योजिले होते. पत्रकार मित्राने रात्रीच्या मैफलीत रात्री अकरानंतर सांगितलेली गोष्ट म्हणजे 'ब्रह्मवाक्य' आहे, याचे प्रत्यंतर भ्रष्टाचाराला अर्ध्या मिनिटात आले. 'अविनाश भोसले' हे दोन शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडताच 'खुल जा सिमसिम'प्रमाणे उध्दवरावांच्या दालनाचे दरवाजे त्याच्यासाठी उघडले गेले. आत नेते, उपनेते, विभागप्रमुख, शाखाप्रमुख अशा मंडळींच्या गर्दीत चि. उध्दवराव बसलेले... चि. उध्दवराव आपल्या सैनिकांना पावसाळयात नाले सफाई, रस्ते दुरुस्तीची टेंडर कशी मंजूर करायची याचे धडे देत होते. लो, हायेस्ट अशी निविदांची बोली ऐकू येत होती. थोडया वेळाने सुटाबुटातील काही खाशी मंडळी दालनात दाखल झाली. 'कुणाची किती टक्क्यांची ऑॅफर आहे?' अशी भाषा भ्रष्टाचाराच्या कानी पडू लागली. काहीतरी सांकेतिक भाषेत बोलले जाऊ  लागले. हे काय चालले आहे हे भ्रष्टाचाराला कळेना. थोडया वेळाने 'झालं का डील फायनल?' असे काहीतरी उध्दवरावांनी समोरच्या मंडळींना विचारले. उपस्थितांनी माना डोलावल्या. शिववडा, चहाचा आस्वाद घेऊन मंडळी पांगली. उध्दवरावांचे लक्ष कोपऱ्यात बसलेल्या भ्रष्टाचाराकडे गेले. ही व्यक्ती आपल्याशी संबंधित नाही, हे त्यांच्या लगेच लक्षात आले. आता औपचारिक ओळख वगैरे करून देण्या-घेण्याचा उपचार पूर्ण करण्याऐवजी भ्रष्टाचार स्वत:च उठला. त्याने उध्दवरावांना आपली ओळख करून दिली. तुम्ही रागावल्याने आपण येथवर आलो वगैरे गोष्टी त्याने सविस्तर सांगितल्या.
''मी तुमच्यावर रागावलो असं कोण म्हणालं?'' उध्दवरावांनी विचारले.
''अहो, तुम्हीच तर म्हणालात ना, जिकडे पाहावं तिकडे भ्रष्टाचारच दिसतोय म्हणून..''
''हो, म्हणालो ना. त्यात काय चुकलं?'' उध्दवरावांची पृच्छा.
''म्हणजे हे बघा, तुम्ही सगळयांना दर्शन देता, मला मात्र देत नाही असं मला म्हणायचं होतं.'' एवढे बोलत उध्दवराव खुर्चीतून उठले. भ्रष्टाचाराचा चेहरा अजूनही बावचळलेलाच दिसत होता. उध्दवरावांनी काय दृष्टान्त दिला आहे, हे भ्रष्टाचाराच्या डोक्यात शिरेपर्यंत उध्दवराव मातोश्रीबाहेर पडले होते.

Sunday, 5 July 2015

चला ' हवा' येऊ द्या

सकाळची साडे नऊ - दहाची वेळ…. वाहनांच्या गर्दीने तुडुंब भरलेला रस्ता …  दुचाकी धारकांच्या झुंडीच्या झुंडी त्या चौकात येउन आदळत होत्या ….त्यात भर पडत होती ती सहा आसनी रिक्षा , बस, चारचाकींची. या गर्दीचा एक भाग बनलेल्या दीपक सरदेशमुख ला ही गर्दी असह्य व्हायची. मात्र दररोजच त्याला या गर्दीचा नाइलाजाने भाग बनावे लागायचे. पन्नाशी नुकतीच ओलांडलेल्या दीपक ला या वाहनांच्या गर्दीचा महासागर दररोज पार करून जावे लागे. श्वास घुसमटून टाकणारी ही गर्दी त्याच्या आयुष्याचा भाग बनून गेली होती. सकाळी आणि संध्याकाळी ऑफिसला जाताना आणि येताना या गर्दीतून मार्ग काढताना त्याला ब्रह्मांड आठवे. संध्याकाळी घरी परतल्यावर चहा घेत असताना आपल्या यांत्रिक जीवनाची त्याला मनस्वी चीड येत असे. मोकळा श्वास सुद्धा घेण्याची परवानगी न ठेवलेल्या या गर्दी आणि कोलाहलाने आपल्या अंगातला चैतन्य, उत्साह यांचा रस शोषून घेतला आहे असे त्याला नेहमी वाटायचे. या आयुष्याच्या नावाने सुस्कारे टाकीत चहा संपवणे आणि फिरायला निघणे हाही त्याच्या आयुष्य्क्रमाचा भाग बनला होता. आपली ही अवस्था पाहून त्याला 'आंधी' मधल्या संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांच्यातल्या एका प्रसंगातील संवादाची हटकून आठवण व्हायची. वडिलांच्या आग्रहापोटी राजकारणात पडावे लागलेल्या सुचित्रा सेन ला आपल्या पतीपासून वेगळे राहण्याशिवाय पर्यायच उरत नाही. पतीने म्हणजे संजीवकुमारने तिच्यापुढे राजकारण किंवा संसार असा पर्याय ठेवलेला असतो. ती राजकारणात गेल्यावर दोघे मनाने विभक्त होतात.राजकारणाच्या धबडग्यात सुचित्रा सेन व्यग्र होऊन जाते. एका निवडणुकीच्या प्रचारासाठी ती संजीवकुमार रहात असलेल्या गावात येते आणि तो व्यवस्थापक असलेल्या हॉटेल मध्येच उतरते. तिला आपला पती त्या हॉटेल चा व्यवस्थापक आहे हे ठाऊकच नसते. कळाल्यावर ती स्वत:हून त्याच्या घरी जाते. नऊ वर्षांनी ते दोघे एकमेकांना भेटत असतात. जेवण वगैरे झाल्या नंतर दोघे गावाजवळच्या एका बागेत जातात. बागेतील फुले, कारंजी या विषयी संजीवकुमार भरभरून सांगत असतो. रात्रीची वेळ असल्याने वातावरणात विलक्षण शांतता असते.बागेतील फुले,  कारंजी या विषयी सांगणाऱ्या संजीव कुमारला अडवून सुचित्रा सेन म्हणते ,' कहा आ पाउंगी मैं,'  तू हे सगळं सांगतो आहेस खरे पण मला  राजकारणातल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून मला बागेत बिगेत जायला कधीच जमणार नाही असा तिच्या बोलण्याचा सूर असतो. तेंव्हा तिच्याकडे पहात किंचितस हसत आकाशातल्या चंद्राकडे बोट दाखवतो आणि म्हणतो, ' ये जो चांद हैं ना इसे रात में देखना ये दिन में निकलता नही ' 
राजकारणातल्या धबडग्यातून जरासाही मोकळा वेळ काढू न शकणाऱ्या आंधीतल्या सुचित्रा सेन आणि वाहनांच्या गर्दीतून रस्ता काढीत, कर्णकर्कश हॉर्नचा कानावर होणारा बलात्कार सहन करत दिवस ढकलणारे आपण यात  दीपकला खूपच साम्य वाटत असे. ऑफिसला जाताना येतानाच नव्हे तर किरकोळ, किरकोळ कामासाठी गावात जावे लागणाऱ्या दीपकला प्रचंड दमायला व्हायचे. त्याच्या घराबाहेरच्या रस्त्यावर पॅगो सहा आसनी रिक्षांचे आणि नियम धुडकावत जाणाऱ्या  नाना प्रकारच्या बाइकचे आवाज त्याला सहन करता यायचे नाहीत. या गर्दीतून आपली दुचाकी दामटत असताना त्याला तीस चाळीस वर्षापूर्वीच्या पुण्याची आठवण होऊ लागायची. आपला मुळचा शांत स्वभाव बाजूला टाकत वाहनांच्या वेगाने धावणारे पुणे पाहून तो नेहमी भयचकित व्हायचा. आजच्या पिढीतल्या मुलांना जुने पुणे इतके सुंदर होते हे ठाऊक होणार नाही या जाणीवेने त्याला अस्वस्थ व्हायला व्हायचे. पुण्याच्या गर्दीचा वेग गाठताना आपल्यासारख्याला धाप लागते मात्र तरुण पिढीला या गर्दीचे , गजबजाटाचे काहीच कसे वाटत नाही याचे त्याला आश्चर्य वाटायचे. ३०- ४० वर्षांपूर्वी पुणे हे खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीय होते. तेंव्हा पुण्यातच नव्हे तर सांगली, सोलापूर, सातारा, नगर , कोल्हापूर या आसपासच्या भागातही नवश्रीमंत नावाची जमात जन्माला आली नव्हती. शिक्षक, सरकारी कारकून, बँक, एलआयसी , कम्प्न्यान्त्ले कारकून , आजूबाजूच्या बजाज, किर्लोस्कर या कम्प्न्यान्त्ले कारकून हा वर्ग खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीय होता. किराणा खरेदी करताना रुपया दोन रुपया वाचविण्याची या वर्गाची धडपड असायची. त्यावेळी बजाज स्कूटर साठी आणि टेलीफोनसाठी नंबर लावणे आणि जमलच तर एखादा फ्लॅट बुक करणे एवढीच मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांची लक्ष्मणरेषा होती. शिक्षक एवढेच नव्हे तर प्राध्यापकाचेही सायकल हेच वाहन होते. संध्याकाळी कामावरून घरी आले की पाय मोकळे करायला लकडी पूल, शनिवार वाडा, पर्वतीपर्यंत जाणे, अधूनमधून नीलायम, प्रभात, विजय हिंदी मराठी सिनेमे पाहणे , फारच चैन म्हणायची झाले तर टीळक रोडवर नेहरू स्टेडियम बाहेर असलेल्या अप्सरा ला कटलेट खायला जाणे … मध्यमवर्गीयांचे जीवन एवढे सुटसुटीत , मर्यादित आणि म्हणूनच छान होते. सर्दी, खोकला  असल्या किरकोळ आजारांवर औषध द्यायला फॅमिली डॉक्टर असायचे, त्यावेळी सर्दी खोकला झाल्यावर सतराशे साठ टेस्ट करून घेण्यास सांगणारे डॉक्टर अजून उदयाला आले नव्हते. हृद्य  विकार, रक्त दाब, मधुमेह, स्पोन्डिलायटीस अशा श्रीमंत आजारांनी त्यावेळी घरोघरी प्रवेश केलेला नव्हता. त्यावेळी फुले मंडईत भाजीला जाताना होंडा , सुझुकी अशा दुचाक्या घेऊन जाण्याची प्रथा रूढ झालेली नव्हती. भरपूर चालणे, सायकलिंग यांनी लहान थोरांच्या तब्येती ठणठणीत होत्या.फॅमिली डॉक्टरचे बिल ही किराणा दुकानदाराप्रमाणे महिन्याच्या महिन्याला चुकते व्हायचे. बहुतांश मध्यमवर्गीयांची घरे भाड्याचीच असायची. वास्तुशास्त्र, फेंगशुई सारख्या वास्तूंच्या शास्त्रांनी झपाटल नव्हतं. दुचाकी सुद्धा फार कमी लोकांकडे असायची. त्यामुळे रात्रीची झोपमोड व्हायला कारचा रिव्हर्स हॉर्न वगैरे भानगड नव्हती. एप्रिल मे मध्ये वसंत व्याख्यानमाला , मॅजेस्टीक गप्पा यांना तुडुंब गर्दी व्हायची. एकूण काय तर गरजा मर्यादित मात्र अमर्यादित अशी स्थिती असायची. त्या निवांत आयुष्यात , ' वेळच मिळत नाही ' अशी तक्रार करायला कोणालाच जागा नव्हती. निवान्तप्णाचा आणि आनंदाचा सुखाचा प्याला सुखाने एन्जॉय करता येत होता. 
आता हे सगळं इतिहासजमा शालेय याची जाणीव दीपक सरदेशमुख ला वारंवार छळायची. चिमणबागेतल्या चाळीत राहणाऱ्या दिपकने आपल्या आयुष्याची जवळपास तीस वर्षे तेथे घालवली होती. आता गावात राहणाऱ्या लोकांना पाय मोकळे करायला बाहेर पडावे म्हटले तर जीव मुठीत घेऊन चालावे लागते. एखाद्या सुट्टीला पर्यटन स्थळी जावे म्हटलं तर तीही माणसांच्या आणि वाहनांच्या गर्दीने गजबजलेली असतात. महाबळेश्वर, दिवेआगर, गणपती पुळे, पन्हाळा. हरी हरेश्वर … कुठेही जा सगळीकडे पुणेकरांची गर्दी असतेच. त्यात मोबाइल नामक कर्ण पिशाचाची भर पडलीय. शरीराने पुण्याबाहेर गेलात तरी मोबाइल तुम्हाला त्याच धकाधकीत आणून सोडतो. असो. आता हे असंच राहणार असे म्हणत दिपकने सुस्कारा टाकला. आजवर त्याने असे किती सुस्कारे टाकले असतील कोणाला ठाऊक ?
चंद्रहास मिरासदार                      
                                                            

Wednesday, 24 June 2015

त्या तिथे पलीकडे, तिकडे, माझिया 'छगन' चे झोपडे ….

 
भगवान शंकर आणि पार्वती पृथ्वीवर निघण्याच्या तयारीत होते. सगळा जामानिमा घेऊन त्यांचे विमान उड्डाण करते. विशेष म्हणजे आज त्यांचे चिरंजीव गणेश हेही आज त्यांच्या समवेत निघतात.  आज त्यांना पृथ्वीच्या दौर्यावर लग्बगॆन निघावं लागलंय. महाराष्ट्र देशातील छगन नामक एका भक्ताने केलेल्या आर्त धाव्यामुळे त्यांना पृथ्वीतलावर निघावे लागले होते. हा भक्त साधा सुधा नव्हता. महाराष्ट्र देशात या भक्ताची कीर्ती पसरली होती. बीओटी, टोल अशा अनेक सिद्धी त्याला वश होत्या. या सिद्धीद्वारे त्यांनी पृथ्वीवर बंगले, महाल, फार्म हाऊस बांधण्याचा धडाकाच लावला होता. अल्लाउद्दिन ज्या प्रमाणे दिवा घासून आपल्या मनातली इच्छा व्यक्त करीत असे आणि त्याची इच्छा पूर्ण होत असे त्या प्रमाणेच छगनरावांकडच्या या सिद्धी काम करीत असत. असे हे छगनराव अत्यंत उदार आणि भोळे म्हणून महाराष्ट्र देशात प्रसिद्ध होते. आपल्याकडे मदत मागायला येणाऱ्या बिल्डर नामक गरीब जमातीतील लोकांवर छगनराव सदोदित कृपा करीत असत. एखाद्या गरजू बिल्डरने हाताला काम नाही म्हणून छ्ग्न्रावनच्या दरबारात हजेरी लावावी आणि एखादा जमिनीचा तुकडा ( बोली भाषेत याला भूखंड म्हणतात) खिशात घालूनच परतावे असा जणू नियमच झालेला होता. त्यामुळेच त्यांची कीर्ती त्रिखंडात पसरली होती. त्यांच्याकडे मदत मागायला येणाऱ्या दारिद्र्य रेषे खालील बिल्डरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली होती. आपल्या दारी आलेला याचक आपल्या ओळखीचा आहे का, कोणाची शिफारस घेऊन आला आहे का, असली कसलीही चौकशी न करता छगनराव त्याला मदत करीत असत. गोरगरीब बिल्डरांना जमीन रुपी दान दिले तरच ही जमात अन्य लोकांच्या बरोबरीला येऊ शकेल , गरीब- श्रीमंत भेद संपुष्टात येईल असा छ्गनरावांचा 'समता'वादी दृष्टीकोन होता. सत्य साईबाबा ज्या प्रमाणे आपल्या भक्तांना हवेतून नाना वस्तू काढून देत असत, अगदी त्या प्रमाणेच हे छगनराव खिशातून भूखंडरुपी अंगारा काढून देत असत. प्रसाद रूपाने मिळालेल्या भूखंडावर गरीब बिचारे बिल्डर इमारत वगैरे बांधून आपल्या व कुटुंबियांच्या दोन वेळच्या भाजी भाकरीची सोय करीत असत. अशा कनवाळू छगनरावांचे बालपण अतिशय कष्टात गेले होते. तरुणपणी ते ' फुलं ' विकत असत म्हणे . मात्र तेवढ्याने आपली गुजराण होणार नाही हे दिसल्याने त्यांनी ' फुले ' विकायला सुरुवात केली. तरुणपणी हे छगनराव अतिशय छोट्या घरात रहात असत. वर सांगितल्याप्रमाणे बीओटी, टोल वगैरे सिद्धींमुळे छगनरावांची चांगलीच भरभराट झालेली होती. लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरू लागली होती.  अशा छगनरावांचा स्वभाव भगवान शंकराप्रमाणेच अत्यंत भोळा होता असे सांगितले जात असे. काही बिल्डर लोक त्यांना हातोहात फसवत असत म्हणे. आपण फार गरीब आहोत असे खोटेनाटे सांगून अनेक श्रीमंत मंडळी अधिक श्रीमंत होऊ लागली होती. असो. तर अशा या भक्ताच्या विनवणीमुळे भगवान शंकर पृथ्वीतलावर निघाले होते. विमानातून भगवान आपल्या भक्ताला शोधत होते. एकदाचा त्यांना आपला भक्त दिसतो. शंकराचे विमान खाली उतरते. भला मोठ्ठा बंगला, त्या बाहेर स्विमिंग पूल, १०० फुटांचा भक्कम लोखंडी दरवाजा, नजर जाइल तिथपर्यंत कुंपण, बंगल्याच्या बाहेर फळझाडे …. हे सारे चित्र भगवान शंकर, पार्वती आणि चि. गणेश पहातच राहतात.
' देवा, आत चला ' भक्त विनवतो. आतल्या महागड्या टाईल्स, छतावर लटकवलेली झुंबरे, दुर्मिळ पुरातन मुर्त्या, गालीचे, गुबगुबीत सोफे, खुर्च्या, भले मोट्ठे टीव्ही असलं वैभव पाहून शंकर फॅमिलीचे डोळे पांढरे होण्याची वेळ येते. त्यांनी स्वर्गात एकाही देवादिकाच्या सोडाच पण कुबेराच्याही घरे असे वैभव पाहिलेले नसते.
' भक्ता , छान बांधला आहे रे महाल. तुझी अशीच प्रगती होवो'. आपल्या भक्ताचा बंगला, डामडौल पाहून खुश झालेले शंकर भक्ताला आशीर्वाद देऊन टाकतात.
' हे पाहायला बोलावलं होतंस का मला एवढ्या घाइघाइने ' शंकर विचारतात. त्यावर छगनराव आपली कैफियत ऐकवायला सुरुवात करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार पृथ्वीतलावर त्यांच्या अशा महालांवरून बराच गोंधळ माजलेला असतो. छगनरावांनी असे महाल बांधायला कोठून पैसा आणला असे विचारून लोकांनी त्यांना हैराण केले असते. छगनरावांच्या मते त्यांना हे सर्व सिद्धीने प्राप्त झालेले आहे. छगनरावांच्या मते  त्यांच्या या घराला महाल म्हणणे अयोग्य होते. हे घर म्हणजे झोपडेच होते. त्यातील वस्तूंसाठी आपल्याला एक पैसाही खर्च करावा लागलेला नसून हे सर्व चमत्कारामुळेच प्राप्त झालेले आहे. भगवान शंकरालाही त्याचे म्हणणे  पटले आहे असे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवू लागते. ते आपल्या भक्ताला या संकटातून बाहेर काढण्याचा आशीर्वाद देण्याच्या तयारीतही असतात. तेवढ्यात मागे उभे राहिलेले चि. गणेश पुढे येतात.
' एवढंच ना, तुमचे महाल महागडे नाहीत हेच सिद्ध करायचे आहे ना तुम्हाला. मग असं तुमच्या  या सगळ्या झोपड्या आम्हाला द्या आणि त्याच्या बदल्यात आमचा महाल घ्या. '
 चि. गणेशाची ही एक्स्चेंज ऑफर छगनरावांनी स्वीकारली का हे अजून कळावयाचे आहे.
चंद्रहास मिरासदार 

Saturday, 30 May 2015

हप्ता हप्ता … बुटा बुटा


रसिक वाचकहो, माझे नाव, गाव, घर क्रमांक, पिन कोड, मोबाइल क्रमांक वगैरे वगैरे इत्यंभूत माहिती एवढेच नव्हे तर माझी संपूर्ण कुंडली तुमच्याकडे असणार आहे याची मला खात्री आहे. त्याचे कारणही तसेच आहे. माझ्याशिवाय तुम्हा मध्यमवर्गीयांचे पानही हलत नाही. तुमच्या जीवनात मला श्वासाइतकेच महत्व आले आहे हे तुम्ही जाणून आहात. हप्ता या दोन शब्दांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकले आहे. अल्लाउद्दिनचा दिवा घासल्यावर मनात इच्छा असलेली कोणतीही गोष्ट समोर हजर होत असे. तसेच माझे नामस्मरण केल्यानंतर घर, कार,  टीव्ही, फ्रीज, मोबाईल, वॉशिंग मशीन, म्युझिक सिस्टीम अशी सर्व सुखे तुमच्यापुढे हात जोडून उभी राहतात. हे कमी की काय म्हणून आता परदेश सहली साठीही माझा वापर होऊ लागला आहे. म्हणजे परदेशात ट्रीपसाठी जायचे असेल तरी बँका कर्जे देऊ लागल्या आहेत. म्हणजे तुमच्यासाठी मी अल्लाउद्दिनचा दिवाच आहे ना. मला तुमच्या जीवनात मिळालेल्या अनन्यसाधारण महत्वामुळे अर्थव्यवस्था नामक आमच्याच पैसा रुपी कुळातील एका बहिणीला चांगले दिवस आल्याचे अभ्यासक मंडळी सांगत असतात. असो. आज तुमच्यापुढे मी वेगळ्याच कारणासाठी मन मोकळं करायला आलो आहे. हल्ली मन मोकळं करायला व्हॉटस अप , फेसबुक, ब्लॉग, ट्विटर आदी बऱ्याच ' चावड्या ' आहेत. या चावडीवर जाउन मन मोकळं केलं तर बरेच जण ते पहातही नसतात. म्हणून हा मार्ग पत्करला. आज मी माझ्या जुळया भावाबाबत दोन शब्द बोलायला आलो आहे. 'हप्त्याचा जुळा भाऊ?' कोण असेल हा ? असा प्रश्न तुमच्या चेहऱ्यावर दिसतो आहे मला. जुळा भाऊ असला तरी आमच्या दोघांचे नाव एकच आहे. मला अलीकडे इएमाय या नावानेही ओळखू जाऊ लागले आहे. त्याचे तसे नाही. त्याला माझ्यासारखे दुसरे नाव नाही. तर या माझ्या जुळ्या भावाच्या पराक्रमाबद्दल बोलण्यासाठी आज मी तुमच्यासमोर आलो आहे. हा माझा जुळा भाऊ माझ्याप्रमाणेच अनेकांच्या जीवनात आनंद आणतो. मात्र त्या बद्दल कोणी चांगले बोलतच नाही हो. 'ईएमआय' ला एवढा आदर आणि मला शिव्याशाप का असा त्याचा प्रश्न आहे. माझा वापर तर सगळेच करतात, पण जाहीर बोलताना माझा उद्धार केला जातो, मला शिव्याशाप दिले जातात अशी त्याची म्हणजेच ' हप्त्या' ची  खंत आहे. तुम्ही सकाळी पेपर वाचता तेंव्हा तुम्ही रहात असलेल्या शहरात, गावात अवैध धंद्यांना ऊत, अवैध धंद्यांकडे पोलिसांचे ' अर्थ 'पूर्ण दुर्लक्ष अशा आशयाच्या बातम्या वाचत असता. अमुक अमुक गावात मटका, जुगार, हातभट्टी अशा धंद्यांना ऊत आला असून पोलिसांनी त्याकडे वेळीच लक्ष द्यावे अशा छापाच्या या बातम्या असतात. पोलिसांकडे जरा चौकशी केली तर असे धंदे असणार्या ठिकाणच्या पोलिस ठाण्यात अथवा चौक्यात आपल्याला पोस्टिंग मिळावे अशी पीएसआय वगैरे मंडळींची इच्छा असते. अशा पोलिस ठाण्यांमध्ये काम करणाऱ्या इन्स्पेक्टर वगैरे मंडळींना 'खात्या पित्या घरचे ' असे म्हणतात. तर माझ्या भावाने सांगितलेली एका अशाच एका पोलिस ठाण्याच्या साहेबाची कथा ऐका. आटपाट नगर होतं. या आटपाट नगरातील एका पोलिस ठाण्याचा साहेब बदलला, तसेच त्या एरियाचा साहेबही बदलला.हे ठाणे वर म्हटल्याप्र्माणे खात्या पित्या प्रकारातले होते. प्रत्येक पोलिस ठाण्यात वसुलदार नामक प्राणी असतो. या प्राण्याचा संबंध तुमच्या सारख्या पांढरपेशा लोकांशी येत नसतो. कारण तो सामान्य माणसासमोर कधीच येत नसतो. तर वसुलदार हा प्राणी मल्टी पर्पज यंत्रासारखा असतो. वरचा साहेब (एसीपी, डीवायएसपी) बदलला की  नवा साहेब कोण येणार, तो कसा आहे याची पोलिस ठाण्यात, चौक्यांत चर्चा चालू होत असते. काही काही वेळा नवा साहेब आपल्या एरियातले दारू, मटका वगैरे धंदे बंद करायला लावत असतो. तसं झालं की नवा साहेब खूपच कडक आहे अशी हवा तयार होऊ लागते. नवा साहेब 'देण्या घेण्या' तला आहे का याची माहिती ठाण्याच्या साहेबाबरोबरच वसुलदारही करीत असतो. नवा साहेब आधी ज्या ज्या ठिकाणी कामाला होता त्या ठिकाणच्या लोकांकडून ही माहिती काढली जाते. बहुतेक साहेब ' देणे - घेणे ' या पंथाचेच असतात. नवा साहेब या पंथातला असला तर ठाण्याची  साहेब लोकं शांत असतात. नव्या साहेबान असे धंदे बंद करायला लावले की ' हप्ता ' वाढवून पाहिजे म्हणून अशी नाटके चालू आहेत असे पोलिस खात्यात बोलले जात असते. तर वरचा साहेब बदलून आल्यानंतर प्रथेप्रमाणे त्याची सगळी माहिती काढली गेली होती. लग्न ठरवण्यापूर्वी मुला मुलीकडची लोकं मुला - मुलीबद्दल आसपास विचारून जशी माहिती काढत असतात तशीच नव्या साहेबाबद्दल माहिती काढली जाते.  त्यावरून नवा साहेब आपल्याच पंथातला आहे हे कळाले होते. वरच्या साहेबाच्या सांगण्यामुळे ठाण्याच्या साहेबाने आपल्या हद्दीतले सगळे धंदे बंद करून टाकले होते. प्रथेप्रमाणे वरच्या साहेबाला ठाण्याचे साहेब भेटायला गेले. वरच्या साहेबाने मानपान कोणत्या पद्धतीने करायचे हे सांगितले. तो आकडा ऐकून ठाण्याचे साहेब जरा विचारात पडले. एवढा हिशोब कसा जुळवायचा हे त्यांच्या लक्षात येईना. मात्र वरचा साहेब सांगेल त्या प्रमाणे मानपान करण्या शिवाय पर्याय नसतो. ठाण्यात आल्यावर साहेब लोकांची चर्चा चालू झाली. ही चर्चा ऐकणारा अण्णा केंगार नावाचा वसुलदार म्हणाला, साहेब काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. साहेब लोकं म्हणाले , कसं शक्य आहे हे ? अण्णा केंगार म्हणाला, आपल्या एरियात नवे धंदे सुरु करायला लावू. त्यानं पटापटा आपल्या एरियातल्या टपोरी लोकांना फोन केले. कुणाला हातभट्टी तर कुणाला मटका असे धंदे सुरु करायला लावले. हातभट्टी च साहित्यही अण्णा केंगारने त्या पोरांना उधार घेऊन दिले. दोन दिवसात सर्व अवैध म्हटले जाणारे धंदे चालू झाले. नव्या साहेबाचा ' वाढीव हप्ता ' व्यवस्थित भागवला गेला.
आणखी एक गोष्ट … आटपाट नगरातल्या अशाच एरियाचा साहेब बदलला गेला. त्याने आपल्या हाताखालील ठाण्याच्या साहेबाला बोलावून घेतले. वरच्या साहेबाकडून जाउन आल्यावर ठाण्याचा साहेब एकदम चिडचिड करायला लागला. ठाण्यातल्या बाकीच्या मंडळींना साहेब असा का वागतोय हे कळेना. रात्री सगळ्या मंडळींनी साहेबांना हॉटेल मध्ये नेले. तीर्थ पोटात गेल्यानंतर ठाण्याचा साहेब पोपटासारखा बोलायला लागला. वरच्या साहेबानं ठाण्याच्या साहेबाकड   हप्ता वाढवून मागितलेला होता. एक दोन हजाराची गोष्ट असती तर कोणाचीच हरकत नव्हती. मात्र एकदम पंचवीस तीस हजार वाढवून मागितल्याने ठाण्याचा साहेब हवालदिल झाला होता. नव्या साहेबाची मागणी कशी पूर्ण करायची यावर सागर संगीत विचार चालू झाला. त्या ठाण्यात अप्पा वाघमोडे नावाचा वसुलदार होता. हा अप्पा एकदम नंबरी माणूस होता. बारा गावचं पाणी प्यायलेला आणि पाच पन्नास साहेबांना पचवलेला अप्पा महाबिलंदर होता. आपल्या समोर चाललेले बोलणे तो शांतपणे ऐकत होता. त्याने ' होतीय सोय, काळजी करू नका ' एवढे पाच शब्दच उच्चारले. त्याचा स्वभाव ठाऊक असल्याने त्याला कोणीच बाकी काही विचारले नाही. दोनच दिवसात त्या गावात , उपनगरात अवैध धंद्यांना ऊत या सारख्या बातम्या सगळ्या पेपरला छापून आल्या. एकाच वेळी सगळ्या पेपरमध्ये बातम्या छापून आल्या, दोन चार चॅनल वाल्यांनीही या बातम्या छापल्या. बातम्या आल्या आल्या अप्पाने ठाण्यात सगळ्या धंदेवाल्यांना बोलावून घेतले. पेपरमधून बातम्या छापून आल्या आहेत, वरचा साहेब खवळलाय वगैरे वगैरे गोष्टी त्याने तिखट मीठ लावून सांगितल्या. धंदा चालू ठेवायचा असेल तर मुकाट हप्ता वाढवून द्या असं सांगितलं. या व्यावसायिक मंडळींनी मुकाट हप्ते वाढवून दिले. नंतर कळाले की अप्पाने पेपरवाल्यांना बोलावून नवा साहेब लईच ' खातो' असं सांगितलं होतं. पेपरवाल्यांनी लगेच बातम्या दिल्या. अशा प्रकारे नव्या साहेबाच्या वाढीव ' हप्त्या' ची सोय झाली.
तर ' हप्ता नारायणांच्या ' या गोष्टी ऐकल्यावर आपल्याबद्दल का वाईट बोललं जातंय असे आमच्या जुळ्या भावाचं म्हणण आहे. आहे का याचं उत्तर तुमच्याकडे ?
- चंद्रहास मिरासदार  

Tuesday, 21 April 2015

उसोंका, द्राक्षोंका सबका कहना हैं, एक हजारोंमे मेरे काका हैं


आमचे काका आणि भविष्य, ज्योतिष यांचं घट्ट नातं आहे. स्मार्ट फोन आणि व्हॉट्स अप हे जसे ' एक दुजे के लिये ' आहेत तसंच आमचे काका आणि भविष्य ही 'रब ने बना दी जोडी' आहे.ये फेविकॉल का   जोड हैं, टुटेगा नही '. तुम्ही म्हणाल हे कसं बुवा ? तुमच्या काकांच्या हातात कधीच कुंडल्या, पत्रिका, जुनी दाते पंचांग दिसत  वगैरे वगैरे कोणतीच अवजारं दिसत नाहीत, तरीही आमच्या काकांचं भविष्य, ज्योतिषाशी जवळचं नातं कसं , असा रोकडा सवाल तुम्ही करणार हे मला ठाऊक आहे. पण आमच्या काकांना भविष्य वगैरे सांगायला जुनी पंचांग, कुंडल्या, पत्रिका वगैरे साहित्याची जरुरी भासत नाही. त्यांच्या डोक्यात अनेकांच्या कुंडल्या, पत्रिका फिट्ट बसल्या आहेत. कोणाच्या पत्रिकेत गुरु , शनी कोणत्या स्थानी आहेत हे आमच्या काकांना माहिती असतं. फक्त माणसांचेच नव्हे तर अन्न धान्याच्या, द्राक्ष, डाळीम्बासारख्या फळांच्या , उसासारख्या पिकांचे भविष्य आमचे काका सांगत असतात. म्हणजे चालू वर्षी गहू , ज्वारीचे एवढे उत्पादन होणार , म्हणून गहू, ज्वारीचे भाव कमी होणार , वाढणार, उसाचे कमी उत्पादन होणार असल्याने साखरेचे भाव वगैरे वाढणार वगैरे वगैरे भविष्य आमचे काका सांगत असतात. तर अशा आमच्या काकांच्या स्वत:च्या भविष्याबद्दल कोणालाच काही सांगता येत नाही. म्हणजे ते केंव्हा कोणता निर्णय घेतील, रस्त्याच्या उजव्या बाजूने चालतील की डाव्या बाजूने की सरळ न जाता एकदम मागे फिरतील हे कोणीच सांगू शकत नाही. त्यांच्या साथीत चालणाऱ्या माणसालाही ते केंव्हा कोठे वळतील हे सांगता येत नाही. तर असे आमचे काका राजकारणातले थोर अष्टपैलू खेळाडू आहेत. फलंदाजी, गोलंदाजी,क्षेत्ररक्षण एवढेच नव्हे तर ते यष्टीरक्षणही छान जमतं. आपल्याच संघातील धावबाद करणे या सारखे खेळ त्यांना उत्तम जमतात असे त्यांचे मित्रच सांगतात. समजा काका फलंदाजी करत असले आणि एखाद्या लांब मारलेल्या फटक्यावर त्यांना धाव घ्यायची आहे असेल तर ते आपल्या नॉन स्ट्रायकर साथीदाराला धाव घेण्याची खून करतील मात्र त्याच्या नकळत प्रतिस्पर्ध्याच्या क्षेत्ररक्षकालाही खूण करतील. ही खूण कोणाच्याच लक्षात येत नाही. प्रतिस्पर्ध्याच्या क्षेत्ररक्षकाला केलेल्या खुणेमुळे काकांचा सहकारी फलंदाज धावबाद होत असे. या साथीदार फलंदाजाला काकानी क्षेत्ररक्षकालाही खून केली होती हे फार उशीरा लक्षात येत असे, तो पर्यंत तो साथीदार तंबूत परतलेला असे. असो. आमचे काका गोलंदाजीला उतरतात तेंव्हा काही वेळा ते ४०- ५० पावलांचा स्टार्ट घेतात. एवढा लांबलचक स्टार्ट पाहून प्रतिस्पर्धी फलंदाजाच्या छातीत धडकीच भरते. त्याला वाटायचे आपल्या दिशेने आता बाउन्सर येणार पण कसचे काय काका एवढ्या लांबून पळत येउन काका अंडर आर्म बॉल टाकत असतात. असा बॉल कसा खेळायचा हे फलंदाजाला ठाऊक नसल्याने तो हमखास बाद होतो. प्रत्यक्ष क्रिकेटप्रमाणे राजकारणात अंडर आर्म चेंडू टाकायला बंदी नाहीये. कधी कधी सामना चुरशीचा होणार असे वाटत असतानाच ते प्रतिस्पर्धी संघाला पूर्ण षटके फलंदाजी करू देणे कसे हिताचे आहे हे सांगू लागतात. असे झाल्यावर सामन्यातील इंटरेस्ट संपून जातो असे त्यांच्या संघातलेच लोक म्हणतात. आमचे काका फिरकी गोलंदाजी करायला येतात तेंव्हा एक पाउल सुद्धा स्टार्ट घेत नाहीत , स्टंपाजवळ उभे राहून ते उंची दिलेला चेंडू टाकतात. असा एकदम हळू वेगाने टाकलेला चेंडू टप्पा पडल्यावर एकदम डोक्याच्या उंचीने उसळत असे. अनेक फलंदाजांना ही भुताटकी वाटत असे . शेन वॉर्न, मुरलीधरन यांच्या सारख्या गोलंदाजांनी त्यांच्याकडे हा ' चौथा ' नामक चेंडू कसा टाकावा या साठी शिकवणी लावली आहे असे कळते. काही वेळा काका आपल्या मूळ गावी ' बारामती ' ला जाण्यासाठी निघत, त्यांना सोडायला त्यांचे सहकारी, पाहुणे बस स्थानकावर जात असत. काका 'बारामती' ला जाणाऱ्या विना वाहक विना थांबा बस मध्ये बसत असत. पण त्यांना सोडायला आलेले सहकारी, पाहुणे गेल्यावर हे बारामतीची गाडी सोडून साबरमती च्या गाडीत हळूच बसत असत. तर असे हे काका. त्यांचे भविष्य, ज्योतिष यांचे नाते किती घट्ट आहे हे सांगण्यासाठी ही उदाहरणे दिली तर असे हे काका पर्वा वांद्र्यात गेले होते. वांद्र्यात जाउन त्यांनी ' नारायणराव येणार , फडणवीस सरकार जाणार पडणार ' असे भविष्य वर्तवले. नारायणरावांसाठी त्यांनी वांद्र्यात जाउन सभा घेतली. खरे तर त्या आधी काकांच्या बारामतीत माळेगाव ची इलेक्शन होती. तिकडे काका फिरकले देखील नाहीत. आपल्या घरचे कार्य सोडून ते शेजारच्या घरातल्या पोराच्या सोडमुंजेसाठी धावत गेले. नारायणरावांचे पाहुणेदेखील या सोडमुंजेला आले नव्हते. असो. बोहल्यावर चढलेल्या नारायणरावांना त्यांच्या मागे उभ्या राहिलेल्या मित्रांनी उचलून घेतले तरी आमदार सुंदरीच्या गळ्यात वरमाला घालता आली नाही. काकांचे भविष्य पुन्हा एकदा चुकले. पण एवढे झाले तरी आमचे काका नाराज झाले नाहीत. त्यांचा भविष्य सांगण्याचा खेळ चालूच आहे. परवा त्यांच्याकडे अजितदादा पवार नामक व्यक्ती आपल्या घड्याळाची पत्रिका घेऊन आली होती म्हणे. कितीही दुरुस्त केले तरी त्यांचे घड्याळ बंद पडतेय म्हणतात. अजितदादांना आमच्या काकांनी काय भविष्य सांगितले हे अजून कळले नाही.
- चंद्रहास मिरासदार

Saturday, 4 April 2015

हंगर अच्छें अच्छें को बदल देता है

चि. उद्धवराव, राजूभाऊ, सदाभाऊ, शीघ्र कवी सम्राट रामदासजी एकमेकांकडे पहात बसली आहेत. सदाभाऊ, राजाभाऊ, रामदासजी यांचे चेहरे भुकेने कासावीस झाले आहेत. न्याहरीची वेळ कधीच संपली आहे, जेवणाचीही वेळ टळून गेलेली आहे. एवढे होऊनही एखादे ताट, डिश येत नाहीये हे पाहून मंडळी अस्वस्थ आहेत. चि. उद्धवरावांच्या चेहऱ्यावर ' थोडा है , थोडे की जरुरत है ' असे काही तरी भाव दिसताहेत. भुकेने अस्वस्थ झालेले तिघे येरझाऱ्या मारताहेतं. मात्र चि. उद्धवराव जागेवरच बसून आहेत. कदाचित आपण जागेवरून उठलो तर आपण बसलोय ती जमीन सुद्धा संपादन केली जाइल अशी भीती त्यांना वाटते आहे. तसे झाले तर आपले डे लाईफ सुद्धा कठीण होईल अशी भावना  त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवते आहे. एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहूनही या मंडळींना आता कंटाळा येऊ लागला आहे. शेवटी राजाभाऊ हातकणंगलेकर उठतात आणि हातातले उसाचे कांडके गुडघ्यावर काडदिशी मोडतात आणि ऊस खाण्यास सुरुवात करतात. क़ाय करणार ' हंगर अच्छे अच्छे को बदल देता है '. पाच मिनिटातच ते ऊस संपवून टाकतात. उसाच्या चुइट्या सर्वत्र पसरलेल्या आहेत. त्यांचा चेहऱ्यावरील अस्वस्थतेची जागा आता संतापाने घेतलीय. आपण मागितलेली ' एफआरपी' न मिळाल्याने आधीच कावलेले सदाभाऊ राजुभाऊंकडे बारिक लक्ष ठेवून आहेत. राजूभाऊ चिडलेले आहेत, त्यांना आणखी डिवचण्याची हीच वेळ आहे हे लक्षात आल्याने सदाभाऊ उठतात. त्यांच्या आडूनच आपल्याला एखादी डिश मिळणार आहे हे त्यांना ठाऊक आहे.
' भाऊ किती दिवस रहायचं या घरात . आपल्याला काही स्वाभिमान आहे की नाही ?' सदाभाऊ मोठमोठ्याने बोलू लागतात. चिडलेल्या सदाभाऊंकडे उद्धवराव मिशीतल्या मिशीत हसत असावेत अशी शंका पाहणाऱ्याला आली असती. उद्धवरावांच्या मनातील भावना सदाभाऊंच्या कदाचित लक्षात आल्या असाव्यात.
' काय हसताय राव तुम्ही. तुमचं बरंय, तुम्हाला स्टार्टर तरी आलंय. आमचं अजून ताटच वाढायला घेतलेलं नाही,' सदाभाऊंच्या शब्दा शब्दातून वैताग प्रकट होतो आहे.
' अरे माझ्यापेक्षा तुमचंच चांगलंय. स्टार्टर देऊन किती वेळ बसवलंय आम्हाला. त्या स्टार्टरनं भूक जाम चाळवलीय. ' उद्धवराव फुसफुस चालू करतात.
' स्टार्टर मिळाल्यानंतर मेन कोर्स लवकर आला नाही तर पोटाचे काय हाल होतात हे तुम्हाला कळणार नाही , सदाभाऊ ' हा संवाद फेकताना उद्धवराव मान हलवत राहतात.
' मला या घरातून पळून जावंसं वाटायला लागलंय. ' राजूभाऊ आपले मौन सोडतात.
' तुमचं म्हणणं खरंय, पण इचलकरंजीत जाउन काय करायचं तरी काय ? तथ जाउन टाळ कुटत बसावं लागल' मगाचा ॲन्ग्रि यंग मॅन् चा लुक बदलत सदाभाऊ बोलू लागतात.
' तुझं म्हणणं खरंय, पण नुसत्या ' वासा' वर किती दिवस रहायचं ?' राजुभाऊंचा सवाल.
इतका वेळ हा संवाद शांतपणे ऐकणारे शीघ्र काव्य सम्राट रामदासजी आठवले आपलं जाकीट सावरत उठतात आणि बोलू लागतात.
' स्वाभिमानाने बसावे, स्वाभिमानाने उठावे
मंत्री होणार होणार म्हणत शांतपणे झोपावे
बाहेर जाउन कोठे रहावे ? कशाला उन्हात अंग भाजून काढावे ?
रामदासजी आठवले यांची अती शीघ्र कविता ऐकून राजूभाऊ चांगलेच गोरेमोरे होतात.
' मी जर तुमच्याजागी असतो तर केंव्हाच पळून गेलो असतो. ' चि. उद्धवराव फुसकुली सोडतात. उद्धवरावांचे बोलणे ऐकून राजुभाऊ ताडकन उठतात आणि आपली बॅग भरू लागतात. आता नक्कीच काही तरी होणार या अपेक्षेने उद्धवरावांचे डोळे लकाकू लागतात.
' सदाभाऊ , तुम्हाला यायचं असंल तर चला, मी चाललो 'असे म्हणत  राजूभाऊ पायात चपला सरकावू लागतात. त्यांचं बोलण ऐकल्यावर सदाभाउंची चुळबुळ चालू होते. ही परिस्थिती पाहून रामदासजी पुन्हा आपली कवितेची नॉन स्टॉप् एक्स्प्रेस चालू करतात.
' सदाभाऊ अशा मित्रांपासून सावध राहू '
जे तुम्हाला म्हणतात , चला घर सोडून जाऊ '
आपण गेलो तर ह्यांचंच फावणार,
आपल्या नावाखाली हेच लोणी खाणार '
रामदास्जींचे काव्य ऐकून राजूभाऊ भरलेली बॅग पुन्हा खाली ठेवतात.
- चंद्रहास मिरासदार

Saturday, 28 March 2015

फुल मुक्त एप्रिल

दरबार भरण्याची वेळ झालेली आहे. दरबारातले अच्चुत्य चिन्हांकित (काही जणांच्या मते हा शब्द अत्युच्च असावा पण चंद्रपूर च्या मूनगंटीवार नामक भाषा तज्ज्ञ सरदाराने हा शब्द अच्चुत्य असल्याचे एक नव्हे अनेक वेळा सांगितले होते. त्यांच्या मराठीच्या या ज्ञानामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या करीता जे प्रयत्न चालू आहेत त्या साठीचे नेतृत्व याच मूनगंटीवार नामक सरदाराकडे सोपवले जाणार असल्याचे कळते. मराठी भाषेचा दर्जा आणखी सुधारावा या साठी हे सरदार तिरुपती येथे बालाजीला  साकडे घालण्यासाठी जाणार असल्याचे कळते. त्या करीता या सरदारांना सरकारी हेलीकॉप्टर उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाराजांनी नुकताच घेतलाय असे कानावर पडते. असो.) सरदार, मनसबदार दरबारात दाखल झालेले आहेत. गारपिटीने दिलेल्या तडाख्याने राज्यात दु:खाचे वातावरण आहे. मात्र रावसाहेब, भाउसाहेब आदी सरकारी मंडळींना आपले नवे सेवेचे नवे दुकान सुरु होणार म्हणून मनातून बरे वाटते आहे. गारपिटीचे पंचनामे, मदतीचे धनादेश अशी अंगमेहनतीची कामे करताना या मंडळींना एवढे श्रम होत की त्यांचे हात आपोआप 'ओले 'होत असत.  या मंडळींना पाउस भरपूर वगैरे पडला की आपली जनतेची सेवेची संधी हुकणार म्हणून अस्वस्थ व्हायला होत असे. पाउस भरपूर पडला की आपल्याला जनतेची टॅन्कर द्वारे पाणी, चारा छावणी वगैरेच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळत नाही असे त्यांचे म्हणणे असायचे. सरदार, सुभेदार, मनसबदार वगैरे मंडळींमध्ये गारपीट वगैरे विषयाचीच चर्चा चालू आहे. तेवढ्यात महाराज आल्याची वर्दी दिली जाते. महाराज, प्रधानजी दरबारात दाखल होतात. महाराज आपल्या आसनावर स्थानापन्न होतात. दरबारावर एक नजर टाकून ते प्रधानजीन्कडे पाहून दरबार सुरु करण्याची खूण करतात. त्याच वेळी ते प्रधानजींना आपल्या मनगटावरच्या घड्याळाकडे खूण करून काही तरी डोळ्यांच्या इशाऱ्यानेच सांगतात. प्रधानजींनी वेळेतच आपले बोलणे संपवावे असा त्या इशाऱ्याचा अर्थ होता. प्रधानजीना तोंडासमोर एकदा माइक आला की किती वेळ सत्संग द्यायचा याचे भानच रहात नसे. दरबारातले बोलणे कमी पडते असे वाटून घेत ते आपली मन की बात या ना त्या मार्गाने जनतेला ऐकवण्याची  संधी सोडत नसत.त्यामुळे महाराजांनी प्रधानजींना प्री पेड कार्ड च दिले होते. पूर्वी प्रधान्जीकडे पोस्ट पेड कार्ड होते. मात्र त्याचे बिल फार येऊ लागल्याने दर दोन तीन दिवसांनी री चार्ज करावे लागेल असे कार्ड दिले होते. असो. हल्ली प्रधानजीच नव्हे तर प्रधानजिंचां गोतावळा फारच बोलू लागला होता. आपला माणूस प्रधान झालाय या आनंदात या लोकांची जीभ वारंवार घसरू लागली होती. जीभ घसरू लागल्यामुळे अनेक अपघात होऊ लागले होते. या मंडळींना ' शब्द्वापसी ' वगैरे प्रकार माहित नव्हते. या शब्दास्त्रांमुळे या परगण्याच्या अवकाशात, जमिनीवर सगळीकडेच युद्धसदृश वातावरण निर्माण झालेले होते. प्रधानजी बोलतात म्हणजे आपणही दिसामाजी काही तरी बोललेच पाहिजे असा समज करून घेऊन या मंडळींनी जो वाग्यज्ञ चालू केला होता त्यात महाराजांच्या राज्यातील शांततेची आहुती पडली होती. असो.
महाराजांची खूण ओळखून प्रधानजींनी बोलणे चालू केले. राज्याच्या काही भागातच यंदा दुष्काळ पडला आहे. खरे तर पावसामुळे दुष्काळाला आपला मुक्काम नाईलाजानेच हलवावा लागलाय. शहरात पाहुणा ज्या दिवशी येतो त्या दिवशीपासूनच अतिथी तुम कब जाओगे असे त्याला अप्रत्यक्षपणे सांगितले जाते. दुष्काळ मात्र त्याला अपवाद ठरतो आहे. त्याने येथे मुक्कामच ठोकावा अशी गळ चारा छावणीचालक, टॅन्कर चालक आदींनी त्याला घातली होती. भाउसाहेब, रावसाहेब आदी मंडळींनी त्या पुढे मजल मारत दुष्काळाच्या पालकांना पत्र पाठवीत त्याचा मुक्काम आणखी काही दिवस लांबवू देण्याची परवानगी मागितलेली होती. मात्र अनेक कामे खोळंबलेली आहेत असे सांगत त्याच्या पालकांनी ही विनंती अमान्य करून टाकलेली आहे. एवढे बोलून प्रधानजी पाणी पिण्याच्या निमित्ताने थांबतात. आणखी बोलले तर चालेल काय अशी परवानगी ते नजरेनेच महाराजांकडे मागतात. तेवढ्यात महाराजांचा चुणचुणीत, तरतरीत भ्रमणभाष ( स्मार्टफोन चे मायबोलीतील रुपांतर) थरथरतो ( व्हायब्रेट चे मायबोलीतील रुपांतर. मूळ इंग्रजी शब्द सांगितल्याखेरीज मराठी शब्दाचा अर्थच काही जणांना कळत नाही.अशांसाठी हे रुपांतर सप्रेम सादर .)  महराज तातडीने आपला भ्रमणभाष मधील संदेश पेटी पाहतात आणि  त्यातील संदेश वाचू लागतात. संदेश वाचताना महाराजांचा चेहरा गंभीर होऊन जातो. प्रधानजींनी  आपल्याकडे आणखी बोलण्याची परवानगी मागितलेली आहे हेही ते संदेश वाचताना विसरून जातात. पूर्ण संदेश वाचून झाल्यावर तर महाराज चांगलेच अस्वस्थ होतात. त्यांना दरदरून घाम फुटतो. त्यांचा चेहरा भयचकित होतो. त्यांची अवस्था पाहिल्यावर प्रधानजी,  सरदार घाबरून जातात. एकदम घाम आलाय हे पाहून काही जणांना वेगळीच शंका येते. तातडीने राजवैद्यांना दूरध्वनी केला जातो. मात्र पाच मिनिटातच महाराज पुन्हा सावरतात. काही घाबरण्याचे कारण नाही असे ते दरबारातील मान्यवरांना सांगतात आणि प्रधानजींना आपले अहवाल वाचन चालू ठेवण्यास सांगतात.
प्रधानजी बोलू लागतात, बाकी राज्यात नेहमीसारखे व्यवस्थित चालू आहे.  रस्त्यांचे आरोग्य बिघडलेले नसून ते पूर्वीसारखेच म्हणजे खड्डेयुक्त आहे. टोल ची साथ राज्यात झपाट्याने पसरत असून राज्यातल्या पायवाटाही टोलग्रस्त होण्याची शक्यता आहे. आता जनतेला टोल वाचून करमत नसल्याने शहरातल्या पदपथांवरही टोल आकारावा अशी मागणी जनतेकडून होऊ लागली आहे.आपणही या मागणीला होकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आपला अर्थसंकल्प नेहमीप्रमाणे तुटीचाच आहे. सामान्य माणसाला करातून सुटका मिळवण्यासाठी कोणतेच मार्ग शिल्लक ठेवले गेलेले नाहीत. राज्यातील खुनी मंडळींनी जादू टोणा वगैरे विद्या आत्मसात केलेल्या असल्याने त्यांना पकडणे अवघड होऊन बसले आहे. आरोपी कसे पकडावेत याचे शिक्षण तांत्रिक, मांत्रिक , बुवा महाराजांकडून मिळावे अशी विनंती पोलिस खात्याने केलेली असून ही मागणी मान्य करण्याचा गांभीर्याने विचार चालू आहे. त्या करीता देवऋषी, बंगाली बाबा वगैरे लोकांशी संपर्क साधण्यात आलेला आहे. डेंग्यू , चिकन गुनिया वगैरेंच्या साथीला आता स्वाईन फ्ल्यू नामक साथ आलेली असून त्याला हजार दोन हजार अशा किरकोळ संख्येने लोक बळी पडलेले आहेत . त्यामुळे ही साथ गंभीरपणे घ्यायची गरज नाहीये. 
एवढे बोलून प्रधानजी आपले चार शब्द संपवतात. प्रधान्जींच्या बोलण्यावरून तरी आपल्या राज्यात सर्व काही नेहमीसारखे चालू आहे, आपले राज्य कालच्याप्रमाणेच चालू आहे, राज्याच्या स्थितीत काडीचाही फरक पडलेला नाही हे महाराजांच्या लक्षात येते. त्यामुळे त्यांचा चेहरा दिव्य समाधानाने झळकू लागतो. मगाशी त्यांच्या भ्रमण भाष वर ' राज्यात स्थिती हाताबाहेर गेलेली आहे, रस्ते खड्डे मुक्त आणि धरणे पाणी युक्त झालेले आहेत, राज्यात सर्वत्र टोल मागे घेण्यात आलेला आहे, साध्वी , महाराज वगैरे प्रधान्जींच्या आप्तांनी तोंडातून ब्र न काढण्याची शपथ घेतलेली आहे ' असा संदेश आलेला असतो. हा संदेश पाहून महाराज अस्वस्थ झालेले असतात. मात्र त्याच वेळी महाराजांचे लक्ष समोर टांगलेल्या कॅलेंडर कडे गेलेले असते. कॅलेंडरवर एक एप्रिल ही तारीख पाहून महाराजांचा जीव भांड्यात पडतो. आपल्याला हा संदेश पाठवून कोणी तरी एप्रिल फुल केलेले आहे हे लक्षात आल्याने महाराज काळजीमुक्त होतात. आपले राज्य पूर्वीच्या वळणावरच चालू आहे या समाधानात ते दरबार संपल्याची खूण करतात.   
चंद्रहास मिरासदार

Saturday, 14 March 2015

पहिल्या अग्रलेखाच्या प्रसव वेदना

एकविसाव्या शतकातल्या ' राजगडा' वर म्हणजे ' कृष्णकुंजा' वर आम्ही पोचलो तेंव्हा सकाळचे अकरा वाजत आले होते. दुपारच्या बारा वाजल्याखेरीज या ' राजगडा' ला जाग येत नाही असे आम्हाला सांगण्यात आले होते. त्यामुळे आम्ही घरातून उशिराच निघालो होतो. सकाळी लवकर जाऊन आपला 'पुतळा ' कशाला करावा असा विचार करून आम्ही आमचे प्रस्थान लांबवले होते. आम्ही पोहोचलो तेंव्हा राजगड आळोखेपिळोखे देत असेल असे आम्हाला वाटले होते. मात्र आमचा अंदाज चुकला (कसा चुकला याचे वर्णन पुढे येईलच). हल्ली या गडावर कोणी फिरकत नाही असे आम्हाला उद्धवराव वांद्रेकर या सद्गृहस्थाने दिवसा ढवळ्या (नाईट लाइफ़वेळी नाही ) सांगितले होते. उद्धवरावांनी जे काही सांगितले ते शत प्रतिशत खरे होते, 'राजगडा' बाहेर अक्षरश: सामसूम जाणवत होती. सामसूम असल्याने आम्हाला 'कृष्ण्कुन्जा' मध्ये कोणाची चिट्ठी नसताना ' राज' रोस प्रवेश मिळाला. आम्ही दिवाणखान्यात जाउन बसलो. गडाच्या स्वामींचे श्वानप्रेम लक्षात घेता आम्ही सांभाळूनच बसलो होतो. आम्हाला आमची ' औकात ' माहिती होती, त्यामुळे आम्हाला चिकन सूप, वडे वगैरेंची अपेक्षा नव्हती. पण निदान चहा तरी विचारला जाइल ही अपेक्षा पूर्ण होताना दिसत नव्हती. एवढ्या मोठ्या घरात एकही मनुष्य प्राणी दिसत नव्हता. आता आपणच गडाच्या स्वामींना शोधावे असा विचार करून आम्ही घरात कोण दिसते आहे का याचा शोध सुरु केला. संपूर्ण घर पालथे घातल्यावर आम्हाला एका खोलीत काहीशी हालचाल जाणवली. खुर्ची सरकावल्याचा, कागद फाड्ल्याचा आवाज कानावर येत होता म्हणून त्या खोलीकडे आम्ही कूच केले. दरवाजावर टकटक करणार तेवढ्यात आम्हाला दरवाजा किंचित उघडाच असल्याचे दिसले. आम्ही भीत भीत दरवाजा ढकलला. या खोलीत गडातील सहायक वगैरे कोणीतरी असेल असे वाटले होते. पण पाहतो तर काय समोर आम्ही ज्यांना भेटण्यास आलो होतो ते रा. श्री. ठाकरे …. हो तेच ते, खळ खटॅक ध्वनी लहरींचे निर्माते, दिग्दर्शक आणि संकलक, 'टोल मस्तकी धरावा अवघा हलकल्लोळ करावा या पथनाट्याचे लेखक, संगीतकार (हे पथनाट्य पहिल्या अंकातील पहिल्या प्रवेशानंतर मागे घेण्यात आले अशी नोंद एका बखरीत सापडते. पथनाट्याला एकही प्रेक्ष न आल्याने ते मागे घेतले असे काही इतिहासकार म्हणतात तर काहींच्या मते पहिल्या प्रवेशालाच एवढे मानधन आणि रॉयल्टी मिळाली की पुढे प्रयोग करण्याची गरजच उरली नाही. असो.), कुणीच टाळी न दिल्याने ज्यांना टाळ वाजवत बसावे लागलं आहे असे, ज्यांच्या कल्पनेतील गोदा पार्कची निर्मिती शतकानुशतके चालू आहे असे महाराष्ट्राचे 'किंचित वॉल्ट डिस्ने ' (काही बखरकारांच्या च्या मते आग्र्याचा ताजमहाल आणि गोदा पार्कच्या निर्मितीचे काम एकाच शक आणि संवत्सरात चालू झाले होते. या विषयी संशोधकांत मतभेद आहेत. असो.) 'टोल प्रतीपालक' रा. श्री. ठाकरे साक्षात उभे होते. आमच्या डोळ्यांवर विश्वास बसेना म्हणून तीन चार वेळा चिमटे काढून पाहिले. प्रत्येक वेळी आपण रा. श्री. ठाकरे यांच्या समोरच उभे आहोत हेच प्रत्येक चिमट्याने सांगितले. स्वारी नेहमी संतापलेली असते असेही आम्ही ऐकून येतो. चुकून माकून काही बोललो तर कानाखाली आवाज निघेल या शक्यतेने   त्यांनी कीप डीस्टन्स वगैरे न लिहिताही आम्ही सुरक्षित अंतरावर उभे होतो. संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग दिसतो आहे का हे आम्ही पाहिले मात्र तशी व्यवस्था कुठेच दिसली नाही.असो. त्या खोलीत आम्हाला जमिनीवर कागदाचे असंख्य कपटे पडलेले दिसले. हे कपटे का पडलेले असावेत याचे कारण कळणे आमची अल्प वगैरे बुद्धी लक्षात घेता शक्यच नव्हते. हे कपटे का पडले असे विचारायची सोय नव्हती. ' ज्यांनी पन्नास वर्षे जनतेच्या अपेक्षांचे कागदापेक्षाही बारीक बारीक तुकडे केले त्यांना असे का केले म्हणून तुम्ही विचारणार नाही, मला मात्र दोन वर्षात कागदाचे कपटे का केले असे विचारता काय, ज्यांनी फक्त कागदी घोडे नाचवले त्यांना जाउन विचारा की' अशा शब्दात स्वारी अंगावर खेकसली तर काय घ्या, म्हणून आम्ही काहीच विचारले नाही. मौन पाळणे आम्ही पसंत केले. 'राजे 'आपल्याच विचारात होते. आम्ही त्यांच्या कशात प्रवेश केला आहे आणि त्यांच्या समोर उभे आहोत हे त्यांच्या अंमळ उशीराच लक्षात आले. एकदा आमच्याकडे आणि एकदा खाली पडलेल्या कागदाच्या कचऱ्याकडे पहात ते म्हणाले, ' फारच कचरा झालाय .'
आम्ही नुसता हुंकार भरला.
' स्साला काय लिहावं हेच कळत नाहीये'
आमचा पुनश्च हुंकार. काय लिहिताय असे विचारले तर ' खळ खटॅक ध्वनी लहरीं कानात शिरून आयुष्यभर हिअरिंग मशीन लावावे लागण्याची भीती डोळ्यापुढे नाचत होती.
' पहिला अग्रलेख लिहायला बसलोय. एक तास झालाय गाडी अजून दादर स्टेशनातच आहे. लिहिण्यापेक्षा भाषण केंव्हाही बरे ' असे काहीसे पुटपुटत त्यांनी आमच्याकडे पाहिले. पुटपुट करीत असतानाच राजे खुर्चीत जाउन बसले. मुद्रा पुन्हा विचारमग्न. खाली पडलेला एक कागद आम्ही त्यांच्या नकळत उचलला आणि त्यांच्या नकळत आम्ही तो वाचू लागलो. एक ऐतीहासिक दस्तऐवज हातात घेतला आहे या जाणीवेने आम्ही रोमांचित होऊन गेलो.इतिहासात नोंद होणाऱ्या एका संपादकाच्या पहिल्या अग्रलेखाचा कच्चा खर्डा आमच्या हातात होता. आम्ही तो वाचावयास सुरुवात केली.
' माझ्या तमाम मराठी बंधू आणि भगिनींनो । आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्या अक्षरांनी नोंद होईल , हे सध्या तरी आम्हाला सांगता येत नाही. आज आम्ही संपादक बनलो आहोत. संपादक झाल्यावर अग्रलेख लिहिणे ओघाने आलेच. काही लोक आमचा पेपर वेळेत निघणार की व्हिजन डॉक्युमेंट प्रमाणे त्याचाही पाळणा लांबणार असे म्हणत होते. अशा लोकांच्या तोंडावर हा पेपर फेकताना आम्हाला झालेला आनंद शब्दात वर्णन करता येईनासा झालाय. अशा बोलण्याची आम्ही सवय करून घेतलीय. काही जण आम्हाला बाईक पार्टी म्हणताहेत. पुढे मी आणि मागे आमचा एकमेव आमदार. अनेकांना आम्ही पेपर का काढतोय हे कळालेले नाही. कुणी म्हणतोय आम्हाला काही काम राहिलेले नाही. एका आमदाराला सांगून सांगून काय सांगणार ? आम्हाला काम राहिलेले नाही हे खरं आहे. किती वेळा नगरसेवकांच्या बैठका घ्यायच्या आणि त्यांना चांगली कामे केली नाहीत तर माझ्याशी गाठ आहे असले इशारे द्यायचे ? '…. या पुढे लेखणीने विश्राम घेतलेला दिसत होता.
' काय लिहावे हेच कळत नाही. नॅशनल काही लिहावे म्हटलं तर त्या जमीन विधेयकातलं आपल्याला काही कळत नाही. आमचा संबंध फक्त मुंबईतील गिरण्यांच्या मोकळ्या जमिनीशी आलाय. तिथं आम्ही चुटकीसरशी जमिनी मिळवल्यात. शेतकरी जीन्स घालून दिसला पाहिजे एवढ्यापुरताच आमचा शेतीशी संबंध आलाय. आपण शेतीवर बोलायला जायचो आणि उद्या व्हॉटस ॲप, फेसबुक वर ' काळ्या मातीत मातीत, इंजिन चालते ' अशी पोस्ट पडायची. ' राजसाहेब मनाशीच बोलत होते. साहेबांचे कन्फ्युजन (खरं तर फ्युजन) आमच्या लक्षात आले होते.
' बाय द वे तुम्ही इथं कशासाठी आला होता ?'
' आपण नवा पेपर काढताय, त्यात भविष्याचा कॉलम लागेलच ना. आम्हाला चान्स मिळेल का   म्हणून विचारायला आलो होतो'
' आमचं भविष्य कळना झालंय आम्हाला आणि तुम्ही भविष्याचा कॉलम लिहू का विचारताय. ' राजे पुन्हा पुटपुटले.
' ते जाऊ द्या, तुम्हाला काय वाटतंय काय लिहावे पहिल्या अग्रलेखात ?' राजेंनी विचारले .
राजे मोकळेपणे बोलताहेत म्हणून आम्ही जरा बेसावध झालो आणि बोललो ' तुम्ही जादूविषयी लिहा.'
' अहो माझी जनतेवर जादू आहेच, त्या शिवाय का लाखोची गर्दी जमते माझ्या सभेला? त्या विषयी मी काय लिहायचे , सगळ्यांना माहिती आहेच आमच्या जादूविषयी. ' राजे स्वत:वर चांगलेच खुश झाले होते.
' त्या जादुविषयी नाही हो. तुम्हाला आकड्यांची मोठी जादू येते म्हणे. '     
' म्हणजे ? मला काही कळल नाही ? राजे उत्तरले.
' काही लोक लाखाचे बारा हजार करतात त्या प्रमाण  तुम्ही तेराचे एक करता म्हणे ? '
पाच दहा सेकंद शांततेत गेले. त्या नंतर ज्याला आम्ही घाबरत होतो त्या खळ खटॅक ध्वनी लहरींचा कल्लोळ आमच्या कानात शिरला. कान अजून हुळहुळतोय.  
चंद्रहास मिरासदार 

Monday, 9 March 2015

मराठी दिनाचा 'इव्हेंट'

हाय गाईज, टुडे वुई हॅव गॅदर्ड हिअर फॉर अ व्हेरी स्पेशल पर्पज. तुम्ही आज आमच्या रिक्वेस्ट चा ऑनर करून येथे आलात त्या बद्दल सर्वांना मेनी मेनी थॅन्क्स्. ऑल ऑफ अस नो, आज आपण येथे का प्रेझेंट राहिलो आहोत. आज आपण येथे मराठी दिन सेलिब्रेट करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आमची ऑर्गनायझेशन किती मराठी प्रेमी आहे याची सर्वांना कल्पना आहेच. आम्ही आमच्या ऑफिस मध्ये जे जे बोर्ड लावले आहेत त्या प्रत्येक बोर्ड खाली त्या त्या शब्दांचे मराठी भाषांतर लिहिलेले आढळून येईल. आमच्या ऑफिस च्या मेन डोअर जवळच लावलेल्या फलकाच्या खाली 'आपले स्वागत असो' अशी छोट्या अक्षरातील तळटीप लिहिलेली दिसून येईल. त्या बोर्ड वर मोठ्या अक्षरात वेलकम असे लिहिलेले दिसून येईल. कोणत्याही एक्स्चेंज ऑफर खाली * अटी लागू असे बारीक आणि न दिसणाऱ्या अक्षरात लिहिलेले असते तसेच आम्ही 'आपले स्वागत असो' असे लिहिलेले आहे. म्हणजे एखादा इंग्लिश न येणाऱ्या आणि फक्त मराठी  वाचता येणाऱ्या लोकांची आम्ही किती सोय केली आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. काही लोक दुकानांवर मराठी पाट्या लावाव्यात अशी डिमांड  करत असतात, त्या साठी व्हायोलन्स करत असतात. बट, आमच्याकडे अशी डिमांड करण्याच्या अगोदरच आम्ही त्यांची डिमांड फुलफील करून टाकली आहे. प्लीज राज साहेबांना आमच्या ऑर्गनायझेशन चे मराठी प्रेम आपण कन्व्हे करावे अशी माझी रिक्वेस्ट आहे. तर आज मी मराठी डे बाबत स्पीच देणार आहे. माझे स्पीच आपण केअरफुली लिसन करावे हि विनंती. तुम्ही आम्ही सर्वांनी एफ़र्टस घेतले तर मराठी नक्कीच एक्झिस्ट राहू शकेल.ऑल ऑफ अस अवेअर आज मराठीला हिंदी , इंग्लिश यांच्याशी खूपच टफ कॉम्पिटीशन द्यावी लागत आहे. आपले फ़ेस्टीव्हल्स आपण विसरत आहोत. आता हे  बघा आपण पूर्वी रंगपंचमी करायचो आता होली लाच सर्व जण रंग खेळतात. रंगपंचमीला कोणी कलर लावतच नाही. आपल्या शहरात भैय्ये वाढल्यामुळे सगळीकडे त्यांचेच फूड आपण खातो आहोत. चाट, तंदूर रोटी, पाणी पुरी…. इंग्लिश तर आपल्याला शिकणे कंपल्सरी झाले आहे. त्या शिवाय आपल्या मुलांना आयटी कंपन्यात नोकर्या मिळायच्या असतील तर त्यांना इंग्लिश आलेच पाहिजे. असे असले तरी आपण मराठी ला आपण विसरून चालणार नाही. आफ्टर ऑल इट इज अवर मदर टंग यार. फॉर धीस पर्पज वुई हॅव डीसायडेड टू स्पीक इन मराठी वन्स अ वीक. आमच्या सर्व मेम्बर्स ना हा रूल फॉलो करण्यास सांगितले. जो कोणी मेम्बर हा रूल फॉलो करणार नाही त्याला आम्ही शिक्षा म्हणून पाच मिनिटे सलग मराठी बोलायला सांगतो. आमचा हा रूल सगळेच मेम्बर्स फॉलो करतात. आंम्ही आमच्या ऑर्गनायझेशन चे मॅगॅझिन काढत असतो. त्यात एक तरी आर्टिकल, पोएम मराठी असली पाहिजे अशी आमची अट च आहे. या मासिकाचे जे एडिटर आहेत त्यांना आम्ही तश्या इंस्ट्रक्श्नस देऊन ठेवल्या आहेत.आय ॲम शुअर आमच्या मॅगॅझिन चे आपण सर्व मेम्बर व्हाल. काही काही ओल्ड जनरेशन चे लोक आमच्या अश्या बोलण्याला मिंग्लिश वगैरे म्हणतात. बट, वुई डोन्ट पे अटेन्शन टू दीज पीपल. हल्लीच्या यंग जनरेशन च्या तोंडातून इंग्लिश शब्द सहज बाहेर पडतात. त्याला आम्ही काय करणार. आता ओल्ड पीपल आपल्याला काही लागले तर आई ग असे म्हणतात. आम्ही यंग पीपल ओह शीट म्हणतो. यात काय चुकले ? आम्ही म्हणूनच अशाच भाषेत आमचे मॅगॅझिन काढत असतो. त्यामुळे आमचे मेम्बर वाढू लागले आहेत. आपली लँग्वेज अलाईव्ह ठेवण्यासाठी आपल्याला अशाच मिंग्लिश भाषेत बोलावे लागणार आहे ,लिहावे लागणार आहे. सो, लेट्स टेक अ प्लेज ऑन द ऑकेजन ऑफ मराठी डे, टू सेव्ह अवर मदर टंग. ऑल ऑफ अस विल स्पीक इन मराठी ॲट लिस्ट वन्स अ डे. देअर इज नो आल्टरनेटिव्ह बिफोर अस. आय थिंक माझे एवढे स्पीच इनफ आहे.मेनी मेनी थॅन्क्स् गाइज फॉर कमिंग हिअर.     
चंद्रहास मिरासदार 

Tuesday, 3 March 2015

माझ्या दमलेल्या ' पप्पू' ची कहाणी

सोनिया मॅम आपल्या निवासस्थानात बसलेल्या आहेत. हातात ' पालक नीती ' ची पुस्तके दिसताहेत. तेवढ्यात त्यांच्या हातातील फोन किणकिणतो. कन्या प्रियंकाचे नाव 'स्क्रीन' वर दिसल्यामुळे मॅम चा चेहरा उजळतो.
' मॉर्निंग, प्रियु बेटा , कशी आहेस '
' मी मस्त, तुझं काय चालू आहेय '
' माझं ठीक नाहीये. तुझ्या भावाचं काय होणार हाच विचार डोक्यात असतो. त्याला कसा हॅन्डल करायचं हेच कळत नाहीये.  त्यामुळेच थोडा त्रास होतोय ' सोनिया मॅम आपली व्यथा सांगतात.
'अगं शिकेल तो हळूहळू, अजून लहान आहे तो.'
' लहान कुठला ४५ वर्षांचा घोडा झालाय. बरं ते जाऊ दे, तुझ्या ओळखीचा प्रौढ बाळांसाठीचा एखादा समुपदेशक आहे का गं?       
' प्रौढ बाळ ? हे काय काढलं आहेस तू ?'
' अग ज्यांचं नुस्त वय वाढलंय अशा बाळांना प्रौढ बाळ म्हणतात असं ह्या पुस्तकात लिहिलंय. आपला राहुल अशांपैकीच आहे. अशा बाळांच्या पालकांकरीता ' पेरेंट्स ओरीएन्टेशन प्रोग्राम घेणारे समुपदेशक असतात असं ह्या पुस्तकात लिहिलेय. बघ जरा चौकशी करून '
आपला भाऊ हुशार असून त्याच्यासाठी समुपदेशक वगैरे लागणार नाहीत असे सांगण्याचा प्रयत्न प्रियंका करते. मात्र आईसाहेब ऐकायलाच तयार नव्हत्या. आईच्या समाधानासाठी हो, बघते असे म्हणत ती फोन ठेवून देते.  सोनिया मॅम पुन्हा पुस्तक वाचण्यात गढून जातात. त्यांची तंद्री भंगते ती दारावर झालेल्या टिकटिकी मुळे. सोनिया मॅम आपल्या तोंडासमोरचे पुस्तक बाजूला करून दरवाज्याच्या दिशेने पाहतात. दरवाजात चि. राहुल उभा असतो.
' काय आहे ? त्रासिक चेहऱ्याने मॅमची पृच्छा.
'रजेचा अर्ज द्यायला आलोय. ' चि. राहुल सांगतात.
'रजा ? तुला कशाला हवीय रजा ?'
' का म्हणजे ?वर्ष सव्वा वर्ष हिंडतोय मी. एका पाठोपाठ एक इलेक्शन झाल्यात. पायाला भिंगरी लावून हिंडलोय. आता मला सुट्टी नको का. किती दमायला झालंय मला. '
' अरे ते नमो अंकल बघ . तुझ्या पेक्षा २० वर्षांनी मोठे आहेत. ते सारखे हिंडत असतात. सारखी कुठे ना कुठे ना भाषणे चालू असतात. एक दिवसही सुट्टी घेतली नाहीये त्यांनी आणि तुला दमायला काय झालं रे हेलीकॉप्टर नं तर हिंडत होतास. सायकल चालवत अस्ता तर दमलाय असं म्हणता आलं असतं ' सोनिया मॅमचा आवाज चांगलाच चढलेला असतो. 
आईच्या हल्ल्याने चिरंजीव चांगलेच प्रथम गांगरतात आणि नंतर चिडतात. तरातरा आईच्या खोलीतून बाहेर पडतात.चिरंजीव चिडले आहेत हे लक्षात आल्यावर त्याच्या मागे मातोश्री धावतात.
' राहुल असं काय करतोस '
' ज्जा, मी नाही बोलणार तुझ्याशी. कट्टी, कट्टी, कट्टी ' स्वारी चांगलीच चिडलेली असते.
' रुसू बाई रुसू, कोपऱ्यात बसू, तिकडून आला शिनचॅन, खुदकन हसू ' असं म्हणत त्या लेकाची समजूत काढायचा प्रयत्न करतात. शिनचॅन चं नाव ऐकल्यावर राहुलच्या चेहऱ्यावर काही काळ बारीक हसू येतं. त्याचा चेहरा पुन्हा फुगतो.
' अरे इथ पार्लमेंट च सेशन चालूय आणि तू रजा मागतो आहेस. '
' मला त्या बजेट मधलं ओ कि ठो कळत नाहीये. महसुली तुट. वित्तीय तुट, भांडवली खर्च, महसुली जमा… सगळ माझ्या डोक्यावरून जातंय. असली भाषणं ऐकून मला झोप येते. मग मिडीयावाले मी डुलक्या काढतो म्हणून बोंब ठोकतात. त्या पेक्षा मी सुट्टीच घेतो ना .'
' त्या लॅन्ड बिलावरून केवढा गोंधळ चालूय. आपल्याला चान्स आलाय त्या मोदींवर ॲटॅक करण्याचा आणि तू चाललास सुट्टीवर '
'त्या लॅन्ड बिलातल मला काहीसुद्धा माहित नाही. त्या पेक्षा तू रॉबर्ट जीजूंना सांग ना ह्यावर बोलायला. त्यांना जमीनी कमी किमतीत कशा ताब्यात घ्यायच्या हे माहिती आहे. '
आपल्या चिरंजीवांचे हे बोल ऐकून मातोश्री कपाळाला हात लावतात. असले उपाय हा सुचवू लागला तर आपले काही खरे नाही हे लक्षात येउन त्या चिरंजीवांची सीएल (चिंतन लीव्ह)  मंजूर टाकतात. - चंद्रहास मिरासदार

Monday, 2 March 2015

एक पत्र - मफलर चे सुटाला


माझे पत्र पाहून तुला नक्कीच आश्चर्य वाटत असेल. एक यकीश्चीत वुलनचा तुकडा माझ्यासारख्या महागड्या वस्त्र प्रावरणाला पत्र लिहिण्याचे धाडसच कसे करतो, असा रास्त प्रश्न तुझ्या चेहऱ्यावर पडलेला दिसतो आहे. मी तुला पत्र लिहिण म्हणजे एखाद्या इमिटेशन दागिन्यान हिर्याच्या नेकलेसला पत्र लिहिण्यासारखे आहे. आपल्या दोघातील तुलना इथेच थांबवतो. कारण मला अजून बरचं बोलायचं आहे. आपण दोघे एकाच कुळातले, भावकीतले.  वुलन, सूत ही एकाच घराण्याची लेकर आहेत हे तुला ठाऊक असेल. एवढ्या पुरताच तुझा आणि माझा संबंध. तू एक वस्त्र आणि मी वस्त्राबरोबर मिळणाऱ्या ॲक्सेसरीसारखा. हौस म्हणून तुला वापरल जात, तर मला गरज म्हणून वापरलं जात. लग्न समारंभात, लग्नाच्या स्वागत समारंभात, एखाद्या बड्या पाहुण्याच्या स्वागताकरिता तुला ट्रंकेतून चुकलो वॉर्डरोबमधून बाहेर काढलं जात. मी कपाटात कुठेतरी पडलेला असतो. किंवा माळ्यावर टाकलेल्या एखाद्या बॅगेत माझी आणि माझ्या थोरल्या भावाची, स्वेटरची आणि माझ्या बहिणीची कानटोपीची रवानगी केलेली असते. तस बघायला गेलं तर आम्ही तिघे अडगळीतच असतो म्हणा ना. आम्हाला माणूस मिरवण्यासाठी कधीच कपाटातून, बॅगेतून बाहेर काढत नाही. त्याची गरज भागवण्यासाठी आम्हाला बाहेर काढतो. त्याच्या लेखी आम्हाला काही किंमत नाही. स्वेटरला खरेदी करताना माणूस  नेपाळी विक्रेत्याशी किती घासाघीस करतात. नेपाळ्या कडून ५०० रुपयांचा स्वेटर १०० - २०० रुपयांत खरेदी केल्यास माणसाला आपण मोठी लढाई जिंकल्याचा आनंद होत असतो.  तसं तुझं नाही. तुझी जी किंमत लावली गेलेली असते तेवढी तुला खळखळ न करता दिली जाते. सामान्य माणसाला देखील आयुष्यात एकदा तरी सूट घालण्याची इच्छा असते. अनेकजण ही इच्छा सासऱ्याच्या पैशातून पूर्ण करतात. त्याकरता अनेक नवरोबा रुसून बसतात. हुंड्यात तू मिळणार हे सासऱ्याकडून कबुल करून घेतल्यावरच अनेक जण बोहल्यावर चढतात. असा मान मी, स्वेटर, कानटोपीला कधीच मिळालेला नाही. एखादा नवरा मुलगा सासऱ्याकडून मफलर हवा आहे म्हणून रुसून बसलाय असं कधी ऐकलं आहेस का ? नाही ना. आमची तेवढी योग्यता नाही. पण आम्ही तिघेही स्वयंपूर्ण आहोत, तू एवढा महागडा असूनही परावलंबीच आहे. सुटा खाली बूटच पाहिजे. सूट - बूट मे आया कन्हैय्या हे गाण तुला ठाऊक असेलच. सुटाखाली साधी चप्पल कोणीच घालत नाही. आमचं तसं नाही. कोणत्याही ड्रेस वर आम्ही फिट्ट बसतो. अमुक रंगाचा शर्ट नाही म्हणून मफलर घातला नाही अस म्हणणारा माणूस कुठेच दिसणार नाही. सूट फाटल्यावर तो रफू करून कोणी घालत नाही. मी फाटलो तरी माझ्यावर पडलेली भोके लपवून मला वापरले जाते.  तर अशा क्षुद्र मफलर ने आपल्याला का पत्र लिहावे असे तुला साहजिकच वाटणार. माझे तुझ्याकडे काही काम असेल अस वाटत असेल तर तो विचार काढून टाक. कुणाकडे शिफारस करण्यासाठी याने आपल्याला लांब लांबच देशस्थी नातं सांगत पत्र लिहिले का असे तुला वाटत असेल तर तुझा हा अंदाजही चुकीचा आहे. अशा कामासाठी तुला पत्र लिहिलेले नाही, लिहिणारही नाही. आपल्या दोघांच्या बाबत जे काही बोलले जात आहे ते माझ्या कानावर आले आहे. त्या बाबत तुझ्याशी बोलावे म्हणून पत्र प्रपंच. बरंच काही बोलायचे असल्याने तेवढा वेळ मोबाईलवर बोलणे मला परवडणार नाही. कारण माझी अवस्था तुला ठाऊक आहे. सध्या भारतात विशेषत: दिल्लीत मला बराच 'भाव' आल्याचे कळते आहे. जिकडे तिकडे माझेच नाव ऐकू येते आहे, तुला मात्र लोकांची बोलणी खावी लागत आहेत, तुझा उद्धार होतोय असंही माझ्या कानावर येतंय. अमिताभ हिरो असलेल्या चित्रपटात सुजित कुमार, ओमप्रकाश, डेव्हिड, असरानी, सुधीर या सारखे सहकलाकार भाव खाउन जावेत असं दिल्लीत झालेल्या ' इलेक्शन ' नामक चित्रपटात दिसले म्हणे. या चित्रपटात नायकाच्या अंगावरच्या १० लाखांच्या सुटाची नव्हे तर सहकलाकाराच्या मफलरचीच चर्चा झाली म्हणे. असे कसे झाले ? तुला माणूस अंगावर घालतो तेच मुळी ' भाव ' खाण्यासाठी, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी. असे असताना तुझा भाव कमी झालाय याचं राहून राहून आश्चर्य वाटतंय. पण जे काही झालंय त्याला तू नाही तर तुला अंगावर मिरवणाराच जबाबदार आहे. तू स्वत:ला अपराधी (मराठीत गिल्टी) वाटून घेऊ नकोस. पूर्वी मुघले आझम मध्ये लावलेल्या काच महालाच्या सेट ची चर्चा झाली होती. देवदास मधल्या ऐश्वर्या, माधुरी च्या महागड्या पेहरावांची चर्चा झाली होती. अलीकडे नेते मंडळींच्या पेहरावाची चर्चा होऊ लागली आहे. काळ किती बदललाय. असो. आपल्यामुळे आपल्या मालकाला बरंच काही ऐकावे लागले असे वाटून घेऊ नका. असे होणारच होते. कुर्ता घालणारा, माझा कुर्ता मीच धुतो असे सांगणारा माणूस जेंव्हा दहा लाखांचा सूट घालतो तेंव्हा लोक 'सूट पे चर्चा ' करणारच. तुझा मालक ज्या राज्यातला आहे त्या राज्यातल्या मो. क. गांधी नामक इसमाने आयुष्यातली बरीच वर्षे अंगावर पंचा घालूनच काढली. 'साहेब ' भेटीला आला किंवा ' साहेबा' च्या भेटीला जायचे असल्यास तो माणूस पंचावरच जायचा. आताच्या काळात असा पेहराव करणे शक्य नाही. तुझ्या मालकाचा काही दिवसांपूर्वी साधा वेश हाच युएसपी होता. मालक जेंव्हा , 'हो मी चहा विकत होतो, गरीबीचे चटके मीही भोगले आहेत ' असे सांगत होता त्याच वेळी लोकांचा त्यावर विश्वास बसला. जर रवीनचंद्र अश्विन उद्या फिरकी सोडून मध्यमगती गोलंदाजी करू लागला किंवा धोनी सलामीला येउन गावस्कर, बॉयकॉट सारखा नांगर टाकू म्हणाला तर त्याचे जे होईल तेच तुझ्या मालकाचे झाले. तुझ्या मालकाच्या नावाने कुर्ते बाजारात आले आणि प्रचंड खपलेही. कारण साध्या कापडाचा कुर्ता हीच तुझ्या मालकाची ओळख होती. तो ही ओळख विसरला, म्हणूनच माझ्या मालकाने तुला मागे टाकले. कारण तू तुझ्या मालकाला ' सूट ' च होत नव्हतास.
असो. बाकी काय ? तुझ्या काही काळाच्या मालकाला (आता तुझा लिलाव झालाय म्हणे आणि तुला ४ कोटीला खरेदी केलंय म्हणे) रामराम सांग. माझा लिलाव होणार नाही , त्यामुळे माझा मालकही  बदलणार नाही.
तुझा
मफलर
प्रिय मफलरा,        
तुझे लांबलचक पत्र मिळाले. तू म्हणाला त्या प्रमाणे मी मालकाला ' सूट ' च होत नव्हतो. तुझ्या मालकाने स्वत:ला लकी म्हणवून घेतले होते. पण मी माझ्या मालकासाठी अनलकी ठरलो. शिवराज पाटील नामक गृहस्थ बॉम्ब स्फोट झाल्यावर कपडे बदलून, सूट घालून पाहणी करायला गेले होते. त्यांना पब्लिकची एवढी बोलणी खावी लागली होती विचारू नको. त्यांचा तो सूट बोहारणीने फुकट सुद्धा नेला नव्हता म्हणे.  आमचा मालक हे कसे काय विसरला कोणास ठाऊक ? शोले मध्ये रमेश सिप्पीने महागडे सेट लावले नव्हते. हीरोंचे (धर्मेंद्र, अमिताभ) कपडे साधे होते. खलनायक गब्बर तर मळक्या कपड्यातच दाखवलेला होता.कळकट अवतारातला, तंबाखू खाणारा गब्बर लोकांनी डोक्यावर घेतला. उलट शान मध्ये खलनायक शाकाल ला सुटा बुटात दाखवले. शान मध्ये प्रचंड खर्चाचे सेट लावले. काय उपयोग झाला ? काहीही नाही. शान दणकून आपटला. आता एवढं रामायण झाल्यावर आयुष्यात पुन्हा कधीच आमचा मालक असला महागडा सूट घालणार नाही.
असो. तुझ्या मालकाला शुभेच्छा.
तुझा
दहा लाखांचा सूट

Saturday, 28 February 2015

शाम्पूवर डँड्रफ फ्री

स्थळ : एक चकाचक मॉल. शर्ट, टीशर्ट, पँट, गॉगल, वहय़ा, पुस्तकं सगळं काही इथं हजर होतं. दुकानाबाहेर मोठा फलक लावलेला. ‘एका शर्टवर एक शर्ट फ्री’. दुकान नुकतंच उघडलं होतं. तेवढय़ात तो बोर्ड वाचून दोन तरुण दुकानात शिरले. त्या दोघांकडे बघून चांदणी क्र. १ ने चांदणी क्र. २ ला खुणावले.
‘आजची बोहणी झाली बघ’, चांदणी क्र. १.
‘तुला कसं कळलं’, चांदणी क्र. २.
‘अगं, ते एकावर एक फ्री चा बोर्ड बघूनच आत शिरले’, चांदणी क्र. १.
‘फार लवकर बोहणी झाली बाई तुझी आज’, चांदणी क्र. २.
‘तुझीही होईल. काळजी करू नकोस. तुझी कसली ऑफर आहे?’ चांदणी क्र. १.
‘पाचशे रुपयांच्या वहय़ांवर एक खोडरबर फ्री’, चांदणी क्र. २.
‘मग तुला फारशी गिऱ्हाईक येत नसतील’, चांदणी क्र. १.
‘छे, गं! भरपूर मिळतात. पलीकडच्या स्टेशनरी दुकानदारानं कसलीच ऑफर दिलेली नाही. त्याच्याकडे अनेक वर्षांपासून
 
वहय़ा, पुस्तके घेणारेही आपली ऑफर वाचून त्याच्याकडे जात नाहीत. तुमच्याकडे ऑफर नाही म्हणून आम्ही पलीकडच्या मॉलमध्ये जातोय, असं त्या दुकानदाराला कित्येकजणी सांगताना मी ऐकलंय’, चांदणी क्र. २.
त्यांचं हे बोलणं चालू असताना ते दोन तरुण बराच वेळ फिरून चार-चार शर्ट खरेदी करतात. या चारावर चार फ्री शर्ट मिळणार असा त्यांचा सरळ हिशेब असतो. दोघांचंही प्रत्येकी एक हजार रुपयांचं बिल होतं. दोघंही बिल चुकते करतात. पावती घेतात. पावती घेऊन मुख्य काऊंटरकडे जातात.
‘गुड मॉर्निग सर’, मुख्य काऊंटरवरची आकर्षक तरुणी त्यांना विचारते.
‘आम्ही दोघांनी चार-चार शर्ट घेतले आहेत. त्यावर आम्हाला चार फ्री शर्ट द्या’, दोघांतील एक तरुण सांगतो.
‘बिल दाखवा, सर!’
‘दोघेही आपापले बिल दाखवतात.’
‘तुम्हाला फ्री शर्ट मिळणार नाहीत’, काऊंटरवरची तरुणी सांगते.
‘पण का, तुम्हीच तर लिहिलंय ना बाहेर बोर्डावर एकावर एक शर्ट फ्री म्हणून’, दोघे तरुण हमरीतुमरीवर येतात.
‘आवाज चढवू नका. बाहेर जाऊन बोर्ड नीट वाचा. मग माझ्याकडे या’, मघापर्यंत नम्रपणे बोलणाऱ्या तरुणीचा आवाज कठोर होतो. ‘एकावर एक शर्ट फ्रीच्या पुढे ‘स्टार’ आहे. त्या स्टारचं स्पष्टीकरण बोर्डाच्या तळाशी आहे. तुम्ही जर १५०० रु.चा एक शर्ट घेतला तर २०० रु.चा शर्ट फ्री अशी ती ऑफर आहे’, तरुणी सांगते.
‘पण आम्ही ते वाचले नाही’, तरुण सांगतात.
‘मग त्याला मी काय करू’, तरुणीचे उत्तर.
दोघेही तरुण बाहेर जाऊन बोर्ड पुन्हा वाचतात. आता त्यांना स्टार दिसतो. बोर्डाच्या तळातली बारीक अक्षरातली अटही दिसते. ती तरुणी बरोबर सांगत होती हे लक्षात येताच दोघेही निमूटपणे मॉलबाहेर पडतात आणि तिकडे चांदणी १ चांदणी २ ला टाळी देते.
थोडय़ाच वेळात मॉलमध्ये भरगच्च गर्दी होते. वेगवेगळय़ा ऑफर बघून ग्राहक येतात. बोर्डवर लिहिल्याप्रमाणे ग्राहक फ्री वस्तूंची मागणी करण्यासाठी काऊंटरवरच्या त्या आकर्षक तरुणीकडे जातात. ती त्यांना ‘चांदणी’ दाखवते. ग्राहक मुकाटपणे बाहेर पडतात. चांदण्या एकमेकींना टाळ्या देऊन दमून जातात.
‘मला एक गोष्ट कळत नाही. ऑफरच्या पुढे आपल्यालाच का टाकतात’, चांदणी क्र. ३ विचारते.
‘चांदणीचा खरा अर्थ लक्षात आल्यावर कस्टमरच्या डोळ्यांसमोर दिवसा काजवे चमकतात. म्हणून माणसाने आपल्याला निवडलंय’, चांदणी क्र. १ सांगते.
‘पण पब्लिकला एवढं कसं कळत नाही?’ चांदणी क्र. २.
‘फ्री’ म्हटल्यावर कस्टमर बाकी काहीही वाचत नाही. एखादी गोष्ट ‘फुकट’ मिळते याचा विलक्षण आनंद कस्टमर लोकांना होतो. उद्या शाम्पूबरोबर डँड्रफ फ्री असा बोर्ड लिहिला तर हजारभर रुपयांचे शाम्पूचे पाऊच घरी घेऊन जातील हे लोक!’ चांदणी क्र. १ सांगते.
चंद्रहास मिरासदार
cm.dedhakka@gmail.com