हाय गाईज, टुडे वुई हॅव गॅदर्ड हिअर फॉर अ व्हेरी स्पेशल पर्पज. तुम्ही आज
आमच्या रिक्वेस्ट चा ऑनर करून येथे आलात त्या बद्दल सर्वांना मेनी मेनी
थॅन्क्स्. ऑल ऑफ अस नो, आज आपण येथे का प्रेझेंट राहिलो आहोत. आज आपण येथे
मराठी दिन सेलिब्रेट करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आमची ऑर्गनायझेशन किती
मराठी प्रेमी आहे याची सर्वांना कल्पना आहेच. आम्ही आमच्या ऑफिस
मध्ये जे जे बोर्ड लावले आहेत त्या प्रत्येक बोर्ड खाली त्या त्या शब्दांचे
मराठी भाषांतर लिहिलेले आढळून येईल. आमच्या ऑफिस च्या मेन डोअर जवळच
लावलेल्या फलकाच्या खाली 'आपले स्वागत असो' अशी छोट्या अक्षरातील तळटीप
लिहिलेली दिसून येईल. त्या बोर्ड वर मोठ्या अक्षरात वेलकम असे लिहिलेले
दिसून येईल. कोणत्याही एक्स्चेंज ऑफर खाली * अटी लागू असे बारीक आणि न
दिसणाऱ्या अक्षरात लिहिलेले असते तसेच आम्ही 'आपले स्वागत असो' असे
लिहिलेले आहे. म्हणजे एखादा इंग्लिश न येणाऱ्या आणि फक्त मराठी वाचता
येणाऱ्या लोकांची आम्ही किती सोय केली आहे हे आपल्या लक्षात आले असेलच.
काही लोक दुकानांवर मराठी पाट्या लावाव्यात अशी डिमांड करत असतात, त्या
साठी व्हायोलन्स करत असतात. बट, आमच्याकडे अशी डिमांड करण्याच्या अगोदरच
आम्ही त्यांची डिमांड फुलफील करून टाकली आहे. प्लीज राज साहेबांना आमच्या
ऑर्गनायझेशन चे मराठी प्रेम आपण कन्व्हे करावे अशी माझी रिक्वेस्ट आहे. तर
आज मी मराठी डे बाबत स्पीच देणार आहे. माझे स्पीच आपण केअरफुली लिसन करावे
हि विनंती. तुम्ही आम्ही सर्वांनी एफ़र्टस घेतले तर मराठी नक्कीच एक्झिस्ट
राहू शकेल.ऑल ऑफ अस अवेअर आज मराठीला हिंदी , इंग्लिश यांच्याशी खूपच टफ
कॉम्पिटीशन द्यावी लागत आहे. आपले फ़ेस्टीव्हल्स आपण विसरत आहोत. आता हे
बघा आपण पूर्वी रंगपंचमी करायचो आता होली लाच सर्व जण रंग खेळतात.
रंगपंचमीला कोणी कलर लावतच नाही. आपल्या शहरात भैय्ये वाढल्यामुळे सगळीकडे
त्यांचेच फूड आपण खातो आहोत. चाट, तंदूर रोटी, पाणी पुरी…. इंग्लिश तर
आपल्याला शिकणे कंपल्सरी झाले आहे. त्या शिवाय आपल्या मुलांना आयटी
कंपन्यात नोकर्या मिळायच्या असतील तर त्यांना इंग्लिश आलेच पाहिजे. असे
असले तरी आपण मराठी ला आपण विसरून चालणार नाही. आफ्टर ऑल इट इज अवर मदर टंग
यार. फॉर धीस पर्पज वुई हॅव डीसायडेड टू स्पीक इन मराठी वन्स अ वीक.
आमच्या सर्व मेम्बर्स ना हा रूल फॉलो करण्यास सांगितले. जो कोणी मेम्बर हा
रूल फॉलो करणार नाही त्याला आम्ही शिक्षा म्हणून पाच मिनिटे सलग मराठी
बोलायला सांगतो. आमचा हा रूल सगळेच मेम्बर्स फॉलो करतात. आंम्ही आमच्या
ऑर्गनायझेशन चे मॅगॅझिन काढत असतो. त्यात एक तरी आर्टिकल, पोएम मराठी असली
पाहिजे अशी आमची अट च आहे. या मासिकाचे जे एडिटर आहेत त्यांना आम्ही तश्या
इंस्ट्रक्श्नस देऊन ठेवल्या आहेत.आय ॲम शुअर आमच्या मॅगॅझिन चे आपण सर्व
मेम्बर व्हाल. काही काही ओल्ड जनरेशन चे लोक आमच्या अश्या बोलण्याला
मिंग्लिश वगैरे म्हणतात. बट, वुई डोन्ट पे अटेन्शन टू दीज पीपल. हल्लीच्या
यंग जनरेशन च्या तोंडातून इंग्लिश शब्द सहज बाहेर पडतात. त्याला आम्ही काय
करणार. आता ओल्ड पीपल आपल्याला काही लागले तर आई ग असे म्हणतात. आम्ही यंग
पीपल ओह शीट म्हणतो. यात काय चुकले ? आम्ही म्हणूनच अशाच भाषेत आमचे
मॅगॅझिन काढत असतो. त्यामुळे आमचे मेम्बर वाढू लागले आहेत. आपली लँग्वेज
अलाईव्ह ठेवण्यासाठी आपल्याला अशाच मिंग्लिश भाषेत बोलावे लागणार आहे
,लिहावे लागणार आहे. सो, लेट्स टेक अ प्लेज ऑन द ऑकेजन ऑफ मराठी डे, टू
सेव्ह अवर मदर टंग. ऑल ऑफ अस विल स्पीक इन मराठी ॲट लिस्ट वन्स अ डे. देअर
इज नो आल्टरनेटिव्ह बिफोर अस. आय थिंक माझे एवढे स्पीच इनफ आहे.मेनी मेनी
थॅन्क्स् गाइज फॉर कमिंग हिअर.
चंद्रहास मिरासदार
चंद्रहास मिरासदार
Mast mirasdarji
ReplyDelete