दरबार भरण्याची वेळ
झालेली आहे. दरबारातले अच्चुत्य चिन्हांकित (काही जणांच्या मते हा शब्द
अत्युच्च असावा पण चंद्रपूर च्या मूनगंटीवार नामक भाषा तज्ज्ञ सरदाराने हा
शब्द अच्चुत्य असल्याचे एक नव्हे अनेक वेळा सांगितले होते. त्यांच्या
मराठीच्या या ज्ञानामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या करीता जे
प्रयत्न चालू आहेत त्या साठीचे नेतृत्व याच मूनगंटीवार नामक सरदाराकडे
सोपवले जाणार असल्याचे कळते. मराठी भाषेचा दर्जा आणखी सुधारावा या साठी हे
सरदार तिरुपती येथे बालाजीला साकडे घालण्यासाठी जाणार असल्याचे कळते. त्या
करीता या सरदारांना सरकारी हेलीकॉप्टर उपलब्ध करून देण्याचा निर्णय
महाराजांनी नुकताच घेतलाय असे कानावर पडते. असो.) सरदार, मनसबदार दरबारात
दाखल झालेले आहेत. गारपिटीने दिलेल्या तडाख्याने राज्यात दु:खाचे वातावरण
आहे. मात्र रावसाहेब, भाउसाहेब आदी सरकारी मंडळींना आपले नवे सेवेचे नवे
दुकान सुरु होणार म्हणून मनातून बरे वाटते आहे. गारपिटीचे पंचनामे,
मदतीचे धनादेश अशी अंगमेहनतीची कामे करताना या मंडळींना एवढे श्रम होत की
त्यांचे हात आपोआप 'ओले 'होत असत. या मंडळींना पाउस भरपूर वगैरे पडला
की आपली जनतेची सेवेची संधी हुकणार म्हणून अस्वस्थ व्हायला होत असे. पाउस
भरपूर पडला की आपल्याला जनतेची टॅन्कर द्वारे पाणी, चारा छावणी वगैरेच्या
माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळत नाही असे त्यांचे म्हणणे असायचे.
सरदार, सुभेदार, मनसबदार वगैरे मंडळींमध्ये गारपीट वगैरे विषयाचीच चर्चा
चालू आहे. तेवढ्यात महाराज आल्याची वर्दी दिली जाते. महाराज, प्रधानजी
दरबारात दाखल होतात. महाराज आपल्या आसनावर स्थानापन्न होतात. दरबारावर एक
नजर टाकून ते प्रधानजीन्कडे पाहून दरबार सुरु करण्याची खूण करतात. त्याच
वेळी ते प्रधानजींना आपल्या मनगटावरच्या घड्याळाकडे खूण करून काही तरी
डोळ्यांच्या इशाऱ्यानेच सांगतात. प्रधानजींनी वेळेतच आपले बोलणे संपवावे
असा त्या इशाऱ्याचा अर्थ होता. प्रधानजीना तोंडासमोर एकदा माइक आला की किती
वेळ सत्संग द्यायचा याचे भानच रहात नसे. दरबारातले बोलणे कमी पडते असे
वाटून घेत ते आपली मन की बात या ना त्या मार्गाने जनतेला ऐकवण्याची संधी
सोडत नसत.त्यामुळे महाराजांनी प्रधानजींना प्री पेड कार्ड च दिले होते.
पूर्वी प्रधान्जीकडे पोस्ट पेड कार्ड होते. मात्र त्याचे बिल फार येऊ
लागल्याने दर दोन तीन दिवसांनी री चार्ज करावे लागेल असे कार्ड दिले होते.
असो. हल्ली प्रधानजीच नव्हे तर प्रधानजिंचां गोतावळा फारच बोलू लागला होता.
आपला माणूस प्रधान झालाय या आनंदात या लोकांची जीभ वारंवार घसरू लागली
होती. जीभ घसरू लागल्यामुळे अनेक अपघात होऊ लागले होते. या मंडळींना '
शब्द्वापसी ' वगैरे प्रकार माहित नव्हते. या शब्दास्त्रांमुळे या
परगण्याच्या अवकाशात, जमिनीवर सगळीकडेच युद्धसदृश वातावरण निर्माण झालेले
होते. प्रधानजी बोलतात म्हणजे आपणही दिसामाजी काही तरी बोललेच पाहिजे असा
समज करून घेऊन या मंडळींनी जो वाग्यज्ञ चालू केला होता त्यात महाराजांच्या
राज्यातील शांततेची आहुती पडली होती. असो.
महाराजांची खूण ओळखून
प्रधानजींनी बोलणे चालू केले. राज्याच्या काही भागातच यंदा दुष्काळ
पडला आहे. खरे तर पावसामुळे दुष्काळाला आपला मुक्काम नाईलाजानेच हलवावा
लागलाय. शहरात पाहुणा ज्या दिवशी येतो त्या दिवशीपासूनच अतिथी तुम कब जाओगे
असे त्याला अप्रत्यक्षपणे सांगितले जाते. दुष्काळ मात्र त्याला अपवाद ठरतो
आहे. त्याने येथे मुक्कामच ठोकावा अशी गळ चारा छावणीचालक, टॅन्कर चालक
आदींनी त्याला घातली होती. भाउसाहेब, रावसाहेब आदी मंडळींनी त्या पुढे मजल
मारत दुष्काळाच्या पालकांना पत्र पाठवीत त्याचा मुक्काम आणखी काही दिवस
लांबवू देण्याची परवानगी मागितलेली होती. मात्र अनेक कामे खोळंबलेली आहेत
असे सांगत त्याच्या पालकांनी ही विनंती अमान्य करून टाकलेली आहे. एवढे
बोलून प्रधानजी पाणी पिण्याच्या निमित्ताने थांबतात. आणखी बोलले तर चालेल
काय अशी परवानगी ते नजरेनेच महाराजांकडे मागतात. तेवढ्यात महाराजांचा
चुणचुणीत, तरतरीत भ्रमणभाष ( स्मार्टफोन चे मायबोलीतील रुपांतर) थरथरतो (
व्हायब्रेट चे मायबोलीतील रुपांतर. मूळ इंग्रजी शब्द सांगितल्याखेरीज मराठी
शब्दाचा अर्थच काही जणांना कळत नाही.अशांसाठी हे रुपांतर सप्रेम सादर .)
महराज तातडीने आपला भ्रमणभाष मधील संदेश पेटी पाहतात आणि त्यातील संदेश
वाचू लागतात. संदेश वाचताना महाराजांचा चेहरा गंभीर होऊन जातो.
प्रधानजींनी आपल्याकडे आणखी बोलण्याची परवानगी मागितलेली आहे हेही ते
संदेश वाचताना विसरून जातात. पूर्ण संदेश वाचून झाल्यावर तर महाराज चांगलेच
अस्वस्थ होतात. त्यांना दरदरून घाम फुटतो. त्यांचा चेहरा भयचकित होतो.
त्यांची अवस्था पाहिल्यावर प्रधानजी, सरदार घाबरून जातात. एकदम घाम आलाय
हे पाहून काही जणांना वेगळीच शंका येते. तातडीने राजवैद्यांना दूरध्वनी
केला जातो. मात्र पाच मिनिटातच महाराज पुन्हा सावरतात. काही घाबरण्याचे
कारण नाही असे ते दरबारातील मान्यवरांना सांगतात आणि प्रधानजींना आपले
अहवाल वाचन चालू ठेवण्यास सांगतात. Saturday, 28 March 2015
फुल मुक्त एप्रिल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment