स्थळ :
एक चकाचक मॉल. शर्ट, टीशर्ट, पँट, गॉगल, वहय़ा, पुस्तकं सगळं काही इथं हजर
होतं. दुकानाबाहेर मोठा फलक लावलेला. ‘एका शर्टवर एक शर्ट फ्री’. दुकान
नुकतंच उघडलं होतं. तेवढय़ात तो बोर्ड वाचून दोन तरुण दुकानात शिरले. त्या
दोघांकडे बघून चांदणी क्र. १ ने चांदणी क्र. २ ला खुणावले.
‘आजची बोहणी झाली बघ’, चांदणी क्र. १.
‘तुला कसं कळलं’, चांदणी क्र. २.
‘अगं, ते एकावर एक फ्री चा बोर्ड बघूनच आत शिरले’, चांदणी क्र. १.
‘फार लवकर बोहणी झाली बाई तुझी आज’, चांदणी क्र. २.
‘तुझीही होईल. काळजी करू नकोस. तुझी कसली ऑफर आहे?’ चांदणी क्र. १.
‘पाचशे रुपयांच्या वहय़ांवर एक खोडरबर फ्री’, चांदणी क्र. २.
‘मग तुला फारशी गिऱ्हाईक येत नसतील’, चांदणी क्र. १.
‘छे, गं! भरपूर मिळतात. पलीकडच्या स्टेशनरी दुकानदारानं कसलीच ऑफर दिलेली नाही. त्याच्याकडे अनेक वर्षांपासून
वहय़ा, पुस्तके
घेणारेही आपली ऑफर वाचून त्याच्याकडे जात नाहीत. तुमच्याकडे ऑफर नाही
म्हणून आम्ही पलीकडच्या मॉलमध्ये जातोय, असं त्या दुकानदाराला कित्येकजणी
सांगताना मी ऐकलंय’, चांदणी क्र. २.
त्यांचं हे बोलणं चालू असताना ते दोन तरुण बराच वेळ
फिरून चार-चार शर्ट खरेदी करतात. या चारावर चार फ्री शर्ट मिळणार असा
त्यांचा सरळ हिशेब असतो. दोघांचंही प्रत्येकी एक हजार रुपयांचं बिल होतं.
दोघंही बिल चुकते करतात. पावती घेतात. पावती घेऊन मुख्य काऊंटरकडे जातात.
‘गुड मॉर्निग सर’, मुख्य काऊंटरवरची आकर्षक तरुणी त्यांना विचारते.
‘आम्ही दोघांनी चार-चार शर्ट घेतले आहेत. त्यावर आम्हाला चार फ्री शर्ट द्या’, दोघांतील एक तरुण सांगतो.
‘बिल दाखवा, सर!’
‘दोघेही आपापले बिल दाखवतात.’
‘तुम्हाला फ्री शर्ट मिळणार नाहीत’, काऊंटरवरची तरुणी सांगते.
‘पण का, तुम्हीच तर लिहिलंय ना बाहेर बोर्डावर एकावर एक शर्ट फ्री म्हणून’, दोघे तरुण हमरीतुमरीवर येतात.
‘आवाज चढवू नका. बाहेर जाऊन बोर्ड नीट वाचा. मग
माझ्याकडे या’, मघापर्यंत नम्रपणे बोलणाऱ्या तरुणीचा आवाज कठोर होतो.
‘एकावर एक शर्ट फ्रीच्या पुढे ‘स्टार’ आहे. त्या स्टारचं स्पष्टीकरण
बोर्डाच्या तळाशी आहे. तुम्ही जर १५०० रु.चा एक शर्ट घेतला तर २०० रु.चा
शर्ट फ्री अशी ती ऑफर आहे’, तरुणी सांगते.
‘पण आम्ही ते वाचले नाही’, तरुण सांगतात.
‘मग त्याला मी काय करू’, तरुणीचे उत्तर.
दोघेही तरुण बाहेर जाऊन बोर्ड पुन्हा वाचतात. आता
त्यांना स्टार दिसतो. बोर्डाच्या तळातली बारीक अक्षरातली अटही दिसते. ती
तरुणी बरोबर सांगत होती हे लक्षात येताच दोघेही निमूटपणे मॉलबाहेर पडतात
आणि तिकडे चांदणी १ चांदणी २ ला टाळी देते.
थोडय़ाच वेळात मॉलमध्ये भरगच्च गर्दी होते. वेगवेगळय़ा
ऑफर बघून ग्राहक येतात. बोर्डवर लिहिल्याप्रमाणे ग्राहक फ्री वस्तूंची
मागणी करण्यासाठी काऊंटरवरच्या त्या आकर्षक तरुणीकडे जातात. ती त्यांना
‘चांदणी’ दाखवते. ग्राहक मुकाटपणे बाहेर पडतात. चांदण्या एकमेकींना टाळ्या
देऊन दमून जातात.
‘मला एक गोष्ट कळत नाही. ऑफरच्या पुढे आपल्यालाच का टाकतात’, चांदणी क्र. ३ विचारते.
‘चांदणीचा खरा अर्थ लक्षात आल्यावर कस्टमरच्या
डोळ्यांसमोर दिवसा काजवे चमकतात. म्हणून माणसाने आपल्याला निवडलंय’, चांदणी
क्र. १ सांगते.
‘पण पब्लिकला एवढं कसं कळत नाही?’ चांदणी क्र. २.
‘फ्री’ म्हटल्यावर कस्टमर बाकी काहीही वाचत नाही.
एखादी गोष्ट ‘फुकट’ मिळते याचा विलक्षण आनंद कस्टमर लोकांना होतो. उद्या
शाम्पूबरोबर डँड्रफ फ्री असा बोर्ड लिहिला तर हजारभर रुपयांचे शाम्पूचे
पाऊच घरी घेऊन जातील हे लोक!’ चांदणी क्र. १ सांगते.
चंद्रहास मिरासदार
cm.dedhakka@gmail.com
|