माझे
पत्र पाहून तुला नक्कीच आश्चर्य वाटत असेल. एक यकीश्चीत वुलनचा तुकडा
माझ्यासारख्या महागड्या वस्त्र प्रावरणाला पत्र लिहिण्याचे धाडसच कसे करतो,
असा रास्त प्रश्न तुझ्या चेहऱ्यावर पडलेला दिसतो आहे. मी तुला पत्र लिहिण
म्हणजे एखाद्या इमिटेशन दागिन्यान हिर्याच्या नेकलेसला पत्र लिहिण्यासारखे
आहे. आपल्या दोघातील तुलना इथेच थांबवतो. कारण मला अजून बरचं बोलायचं आहे.
आपण दोघे एकाच कुळातले, भावकीतले. वुलन, सूत ही एकाच घराण्याची लेकर आहेत
हे तुला ठाऊक असेल. एवढ्या पुरताच तुझा आणि माझा संबंध. तू एक वस्त्र आणि
मी वस्त्राबरोबर मिळणाऱ्या ॲक्सेसरीसारखा. हौस म्हणून तुला वापरल जात, तर
मला गरज म्हणून वापरलं जात. लग्न समारंभात, लग्नाच्या स्वागत समारंभात,
एखाद्या बड्या पाहुण्याच्या स्वागताकरिता तुला ट्रंकेतून चुकलो
वॉर्डरोबमधून बाहेर काढलं जात. मी कपाटात कुठेतरी पडलेला असतो. किंवा
माळ्यावर टाकलेल्या एखाद्या बॅगेत माझी आणि माझ्या थोरल्या भावाची,
स्वेटरची आणि माझ्या बहिणीची कानटोपीची रवानगी केलेली असते. तस बघायला
गेलं तर आम्ही तिघे अडगळीतच असतो म्हणा ना. आम्हाला माणूस मिरवण्यासाठी
कधीच कपाटातून, बॅगेतून बाहेर काढत नाही. त्याची गरज भागवण्यासाठी आम्हाला
बाहेर काढतो. त्याच्या लेखी आम्हाला काही किंमत नाही. स्वेटरला खरेदी
करताना माणूस नेपाळी विक्रेत्याशी किती घासाघीस करतात. नेपाळ्या कडून ५००
रुपयांचा स्वेटर १०० - २०० रुपयांत खरेदी केल्यास माणसाला आपण मोठी लढाई
जिंकल्याचा आनंद होत असतो. तसं तुझं नाही. तुझी जी किंमत लावली गेलेली
असते तेवढी तुला खळखळ न करता दिली जाते. सामान्य माणसाला देखील आयुष्यात
एकदा तरी सूट घालण्याची इच्छा असते. अनेकजण ही इच्छा सासऱ्याच्या पैशातून
पूर्ण करतात. त्याकरता अनेक नवरोबा रुसून बसतात. हुंड्यात तू मिळणार हे
सासऱ्याकडून कबुल करून घेतल्यावरच अनेक जण बोहल्यावर चढतात. असा मान मी,
स्वेटर, कानटोपीला कधीच मिळालेला नाही. एखादा नवरा मुलगा सासऱ्याकडून मफलर
हवा आहे म्हणून रुसून बसलाय असं कधी ऐकलं आहेस का ? नाही ना. आमची तेवढी
योग्यता नाही. पण आम्ही तिघेही स्वयंपूर्ण आहोत, तू एवढा महागडा असूनही
परावलंबीच आहे. सुटा खाली बूटच पाहिजे. सूट - बूट मे आया कन्हैय्या हे गाण
तुला ठाऊक असेलच. सुटाखाली साधी चप्पल कोणीच घालत नाही. आमचं तसं नाही.
कोणत्याही ड्रेस वर आम्ही फिट्ट बसतो. अमुक रंगाचा शर्ट नाही म्हणून मफलर
घातला नाही अस म्हणणारा माणूस कुठेच दिसणार नाही. सूट फाटल्यावर तो रफू
करून कोणी घालत नाही. मी फाटलो तरी माझ्यावर पडलेली भोके लपवून मला
वापरले जाते. तर अशा क्षुद्र मफलर ने आपल्याला का पत्र लिहावे असे तुला
साहजिकच वाटणार. माझे तुझ्याकडे काही काम असेल अस वाटत असेल तर तो विचार
काढून टाक. कुणाकडे शिफारस करण्यासाठी याने आपल्याला लांब लांबच देशस्थी
नातं सांगत पत्र लिहिले का असे तुला वाटत असेल तर तुझा हा अंदाजही चुकीचा
आहे. अशा कामासाठी तुला पत्र लिहिलेले नाही, लिहिणारही नाही. आपल्या
दोघांच्या बाबत जे काही बोलले जात आहे ते माझ्या कानावर आले आहे. त्या बाबत
तुझ्याशी बोलावे म्हणून पत्र प्रपंच. बरंच काही बोलायचे असल्याने तेवढा
वेळ मोबाईलवर बोलणे मला परवडणार नाही. कारण माझी अवस्था तुला ठाऊक आहे.
सध्या भारतात विशेषत: दिल्लीत मला बराच 'भाव' आल्याचे कळते आहे. जिकडे
तिकडे माझेच नाव ऐकू येते आहे, तुला मात्र लोकांची बोलणी खावी लागत आहेत,
तुझा उद्धार होतोय असंही माझ्या कानावर येतंय. अमिताभ हिरो असलेल्या
चित्रपटात सुजित कुमार, ओमप्रकाश, डेव्हिड, असरानी, सुधीर या सारखे
सहकलाकार भाव खाउन जावेत असं दिल्लीत झालेल्या ' इलेक्शन ' नामक चित्रपटात
दिसले म्हणे. या चित्रपटात नायकाच्या अंगावरच्या १० लाखांच्या सुटाची
नव्हे तर सहकलाकाराच्या मफलरचीच चर्चा झाली म्हणे. असे कसे झाले ? तुला
माणूस अंगावर घालतो तेच मुळी ' भाव ' खाण्यासाठी, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी.
असे असताना तुझा भाव कमी झालाय याचं राहून राहून आश्चर्य वाटतंय. पण जे
काही झालंय त्याला तू नाही तर तुला अंगावर मिरवणाराच जबाबदार आहे. तू
स्वत:ला अपराधी (मराठीत गिल्टी) वाटून घेऊ नकोस. पूर्वी मुघले आझम मध्ये
लावलेल्या काच महालाच्या सेट ची चर्चा झाली होती. देवदास मधल्या ऐश्वर्या,
माधुरी च्या महागड्या पेहरावांची चर्चा झाली होती. अलीकडे नेते मंडळींच्या
पेहरावाची चर्चा होऊ लागली आहे. काळ किती बदललाय. असो. आपल्यामुळे आपल्या
मालकाला बरंच काही ऐकावे लागले असे वाटून घेऊ नका. असे होणारच होते. कुर्ता
घालणारा, माझा कुर्ता मीच धुतो असे सांगणारा माणूस जेंव्हा दहा लाखांचा
सूट घालतो तेंव्हा लोक 'सूट पे चर्चा ' करणारच. तुझा मालक ज्या राज्यातला
आहे त्या राज्यातल्या मो. क. गांधी नामक इसमाने आयुष्यातली बरीच वर्षे
अंगावर पंचा घालूनच काढली. 'साहेब ' भेटीला आला किंवा ' साहेबा' च्या
भेटीला जायचे असल्यास तो माणूस पंचावरच जायचा. आताच्या काळात असा पेहराव
करणे शक्य नाही. तुझ्या मालकाचा काही दिवसांपूर्वी साधा वेश हाच युएसपी
होता. मालक जेंव्हा , 'हो मी चहा विकत होतो, गरीबीचे चटके मीही
भोगले आहेत ' असे सांगत होता त्याच वेळी लोकांचा त्यावर विश्वास बसला. जर
रवीनचंद्र अश्विन उद्या फिरकी सोडून मध्यमगती गोलंदाजी करू लागला किंवा
धोनी सलामीला येउन गावस्कर, बॉयकॉट सारखा नांगर टाकू म्हणाला तर त्याचे जे
होईल तेच तुझ्या मालकाचे झाले. तुझ्या मालकाच्या नावाने कुर्ते बाजारात आले
आणि प्रचंड खपलेही. कारण साध्या कापडाचा कुर्ता हीच तुझ्या मालकाची ओळख
होती. तो ही ओळख विसरला, म्हणूनच माझ्या मालकाने तुला मागे टाकले. कारण तू
तुझ्या मालकाला ' सूट ' च होत नव्हतास.
असो. बाकी काय ? तुझ्या काही
काळाच्या मालकाला (आता तुझा लिलाव झालाय म्हणे आणि तुला ४ कोटीला खरेदी
केलंय म्हणे) रामराम सांग. माझा लिलाव होणार नाही , त्यामुळे माझा मालकही
बदलणार नाही.
No comments:
Post a Comment