भगवान
शंकर आणि पार्वती पृथ्वीवर निघण्याच्या तयारीत होते. सगळा जामानिमा घेऊन
त्यांचे विमान उड्डाण करते. विशेष म्हणजे आज त्यांचे चिरंजीव गणेश हेही आज
त्यांच्या समवेत निघतात. आज त्यांना पृथ्वीच्या दौर्यावर लग्बगॆन निघावं
लागलंय. महाराष्ट्र देशातील छगन नामक एका भक्ताने केलेल्या आर्त
धाव्यामुळे त्यांना पृथ्वीतलावर निघावे लागले होते. हा भक्त साधा सुधा
नव्हता. महाराष्ट्र देशात या भक्ताची कीर्ती पसरली होती. बीओटी, टोल अशा
अनेक सिद्धी त्याला वश होत्या. या सिद्धीद्वारे त्यांनी पृथ्वीवर बंगले,
महाल, फार्म हाऊस बांधण्याचा धडाकाच लावला होता. अल्लाउद्दिन ज्या प्रमाणे
दिवा घासून आपल्या मनातली इच्छा व्यक्त करीत असे आणि त्याची इच्छा पूर्ण
होत असे त्या प्रमाणेच छगनरावांकडच्या या सिद्धी काम करीत असत. असे हे
छगनराव अत्यंत उदार आणि भोळे म्हणून महाराष्ट्र देशात प्रसिद्ध होते.
आपल्याकडे मदत मागायला येणाऱ्या बिल्डर नामक गरीब जमातीतील लोकांवर छगनराव
सदोदित कृपा करीत असत. एखाद्या गरजू बिल्डरने हाताला काम नाही म्हणून
छ्ग्न्रावनच्या दरबारात हजेरी लावावी आणि एखादा जमिनीचा तुकडा ( बोली भाषेत
याला भूखंड म्हणतात) खिशात घालूनच परतावे असा जणू नियमच झालेला होता.
त्यामुळेच त्यांची कीर्ती त्रिखंडात पसरली होती. त्यांच्याकडे मदत मागायला
येणाऱ्या दारिद्र्य रेषे खालील बिल्डरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली
होती. आपल्या दारी आलेला याचक आपल्या ओळखीचा आहे का, कोणाची शिफारस घेऊन
आला आहे का, असली कसलीही चौकशी न करता छगनराव त्याला मदत करीत असत. गोरगरीब
बिल्डरांना जमीन रुपी दान दिले तरच ही जमात अन्य लोकांच्या बरोबरीला येऊ
शकेल , गरीब- श्रीमंत भेद संपुष्टात येईल असा छ्गनरावांचा 'समता'वादी
दृष्टीकोन होता. सत्य साईबाबा ज्या प्रमाणे आपल्या भक्तांना हवेतून नाना
वस्तू काढून देत असत, अगदी त्या प्रमाणेच हे छगनराव खिशातून भूखंडरुपी
अंगारा काढून देत असत. प्रसाद रूपाने मिळालेल्या भूखंडावर गरीब बिचारे
बिल्डर इमारत वगैरे बांधून आपल्या व कुटुंबियांच्या दोन वेळच्या भाजी
भाकरीची सोय करीत असत. अशा कनवाळू छगनरावांचे बालपण अतिशय कष्टात गेले
होते. तरुणपणी ते ' फुलं ' विकत असत म्हणे . मात्र तेवढ्याने आपली गुजराण
होणार नाही हे दिसल्याने त्यांनी ' फुले ' विकायला सुरुवात केली. तरुणपणी
हे छगनराव अतिशय छोट्या घरात रहात असत. वर सांगितल्याप्रमाणे बीओटी, टोल
वगैरे सिद्धींमुळे छगनरावांची चांगलीच भरभराट झालेली होती. लक्ष्मी
त्यांच्या घरी पाणी भरू लागली होती. अशा छगनरावांचा स्वभाव भगवान
शंकराप्रमाणेच अत्यंत भोळा होता असे सांगितले जात असे. काही बिल्डर लोक
त्यांना हातोहात फसवत असत म्हणे. आपण फार गरीब आहोत असे खोटेनाटे सांगून
अनेक श्रीमंत मंडळी अधिक श्रीमंत होऊ लागली होती. असो. तर अशा या भक्ताच्या
विनवणीमुळे भगवान शंकर पृथ्वीतलावर निघाले होते. विमानातून भगवान आपल्या
भक्ताला शोधत होते. एकदाचा त्यांना आपला भक्त दिसतो. शंकराचे विमान खाली
उतरते. भला मोठ्ठा बंगला, त्या बाहेर स्विमिंग पूल, १०० फुटांचा भक्कम
लोखंडी दरवाजा, नजर जाइल तिथपर्यंत कुंपण, बंगल्याच्या बाहेर फळझाडे …. हे
सारे चित्र भगवान शंकर, पार्वती आणि चि. गणेश पहातच राहतात.
'
देवा, आत चला ' भक्त विनवतो. आतल्या महागड्या टाईल्स, छतावर लटकवलेली
झुंबरे, दुर्मिळ पुरातन मुर्त्या, गालीचे, गुबगुबीत सोफे, खुर्च्या, भले
मोट्ठे टीव्ही असलं वैभव पाहून शंकर फॅमिलीचे डोळे पांढरे होण्याची वेळ
येते. त्यांनी स्वर्गात एकाही देवादिकाच्या सोडाच पण कुबेराच्याही घरे असे
वैभव पाहिलेले नसते.
' भक्ता , छान बांधला आहे रे महाल. तुझी
अशीच प्रगती होवो'. आपल्या भक्ताचा बंगला, डामडौल पाहून खुश झालेले शंकर
भक्ताला आशीर्वाद देऊन टाकतात.
No comments:
Post a Comment